India US Relations: फ्रान्समध्ये आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या सार्वभौमत्वाबद्दल आणि सुरक्षेबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत संयुक्त पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, 'जर भारताच्या सुरक्षेला कधीही धोका निर्माण झाला किंवा भारतावर हल्ला झाला, तर अमेरिका संपूर्ण शक्तीनिशी भारताच्या बाजूने उभी राहील. विशेषतः पंतप्रधान मोदी देशाचे नेतृत्व करत असताना अमेरिका भारताला लष्करी आणि धोरणात्मक स्तरावर सर्वतोपरी मदत करेल,' असा शब्द ट्रम्प यांनी दिला आहे. हा शब्द शेजारील शत्रू राष्ट्रांसाठी, विशेषतः पाकिस्तानसाठी एक मोठा धोरणात्मक धक्का मानला जात आहे.
भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा मुद्दा
दरम्यान, पश्चिम आशियातील अमेरिकेच्या लष्करी कारवाईदरम्यान भारताच्या 3 खलाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या संवेदनशील विषयावर बोलताना ट्रम्प यांनी हा अत्यंत आव्हानात्मक व्यवसाय असल्याचे सांगत, दोन्ही देश या समस्येवर एकत्रितपणे काम करत असल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यांनी भारतीय खलाशांबद्दल तीव्र आदर आणि सहसंवेदना व्यक्त केल्या. या संवादादरम्यान ट्रम्प यांनी वर्ष 2020 मधील त्यांच्या ऐतिहासिक भारत दौऱ्याची आणि अहमदाबादमधील 'नमस्ते ट्रम्प' सोहळ्याची आवर्जून आठवण काढली. ते म्हणाले, "आम्ही तिथे एका भव्य स्टेडियमचे उद्घाटन केले होते, ज्याची क्षमता 1.5 लाख प्रेक्षकांची होती. पण त्या दिवशी स्टेडियमबाहेर 2.5 लाख आणि मैदानावर 1 लाख लोक उपस्थित होते. हा एक असा जागतिक विक्रम आहे जो कदाचित आजही कोणी मोडू शकलेले नाही."
पंतप्रधान मोदींच्या कठोर वाटाघाटी कौशल्याचे कौतुक
डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे आणि त्यांच्या वाटाघाटी करण्याच्या पद्धतीचे तोंडभरून कौतुक केले. ट्रम्प मिश्कीलपणे म्हणाले की, मोदी दिसायला अत्यंत शांत आणि एखाद्या देवदूतासारखे वाटतात, परंतु देशाच्या हिताचा विचार येतो तेव्हा ते अत्यंत कठोर आणि कसलेले मुत्सद्दी आहेत. ते एक अत्यंत कुशल व्यापारी आणि नेते आहेत, ज्यांचे भारतीय जनतेवर प्रचंड प्रेम आहे आणि त्यांना अमेरिकेबद्दलही तितकीच आपुलकी आहे. अमेरिकेतील ह्युस्टन येथे झालेल्या 'Howdy Modi' कार्यक्रमाचा उल्लेख करत ट्रम्प यांनी आगामी काळात पुन्हा एकदा भारत दौऱ्यावर येण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली.
हेही वाचा – US Iran Peace Deal: 'इराणने अटी पाळल्या नाहीत, तर…'; डोनाल्ड ट्रम्प यांचे खळबळजनक विधान
जागतिक सागरी मार्गांची सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय करारांवर चर्चा
याशिवाय, या द्विपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारी मार्गांच्या सुरक्षेचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा अमेरिकेसमोर मांडला. जगातील विविध सागरी क्षेत्रांमध्ये आणि व्यापारी जहाजांवर लाखो भारतीय खलाशी सेवा बजावत असून, त्यांच्या जीविताचे रक्षण करणे ही जागतिक जबाबदारी असल्याचे मोदींनी अधोरेखित केले. भारत नेहमीच सागरी वाहतुकीच्या स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता राहिला आहे. पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि हॉर्मुझ सामुद्रधुनीतील सुरक्षेच्या प्रश्नांवर बोलताना मोदींनी आशा व्यक्त केली की, भविष्यात इराणशी संबंधित कोणताही आंतरराष्ट्रीय करार किंवा समझोता झाल्यास, त्यामध्ये खलाशांच्या सुरक्षेला पहिल्या क्रमांकाचे प्राधान्य दिले जाईल. दोन्ही नेत्यांमधील ही भेट जागतिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत दूरगामी ठरणार आहे.