Hidden Smartphone Shortcuts : अँड्रॉइड स्मार्टफोन वापरणाऱ्या बहुतांश लोकांना असे वाटते की, मोबाईलच्या कडेला असलेल्या व्हॉल्यूम बटणचा वापर केवळ रिंगटोन किंवा गाण्यांचा आवाज कमी-जास्त करण्यासाठीच होतो. पण तुम्हाला माहीत आहे का, की हे भौतिक (physical) बटण तुमच्या रोजच्या वापरातील अनेक गोष्टी खूप सोप्या करू शकते? जर तुमचा फोन हँग झाला असेल किंवा तुम्हाला झटपट काही गोष्टी करायच्या असतील, तर हे बटण एका जादुई शॉर्टकटसारखे काम करते. या बटणचे भन्नाट फीचर्स जाणून घेऊन तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचा अधिक स्मार्टपणे वापर करू शकता.
आपत्कालीन परिस्थितीत फोन 'फोर्स रीस्टार्ट' करणे
अनेकदा सततच्या वापरामुळे किंवा जड ॲप्समुळे स्मार्टफोन अचानक पूर्णपणे हँग होतो. अशा वेळी स्क्रीन काम करत नाही आणि कोणतेही ॲप बंद होत नसल्याने युजर्स गोंधळून जातात. या समस्येवर व्हॉल्यूम बटण अत्यंत उपयुक्त ठरते. मोबाईल हँग झाल्यावर काही सेकंदांसाठी पॉवर बटण आणि व्हॉल्यूम डाऊन (Volume Down) बटण एकाच वेळी दाबून ठेवल्यास फोन 'फोर्स रीस्टार्ट' होतो. मात्र, ही युक्ती केवळ आपत्कालीन परिस्थितीतच वापरावी, नेहमी नेहमी याचा वापर करणे टाळावे.
कॅमेऱ्यातून फोटो क्लिक करणे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग
मोबाईलने फोटो काढताना स्क्रीनवरील बटण दाबणे अनेकदा गैरसोयीचे ठरते, विशेषतः सेल्फी घेताना फोन हातातून पडण्याची भीती असते. यावर सोपा उपाय म्हणजे कॅमेरा ॲप सुरू असताना व्हॉल्यूम बटण दाबल्यास थेट फोटो क्लिक होतो. एवढेच नाही तर व्हिडिओ मोडमध्ये असताना हेच बटण दाबून तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू किंवा बंद (Start/Stop) देखील करू शकता.
कॅमेऱ्यात परफेक्ट 'झूम इन' आणि 'झूम आउट' करणे
कॅमेरा सेटिंग्जमध्ये तुम्हाला 'व्हॉल्यूम बटण फंक्शन' (Volume Button Function) नावाचा एक विशेष पर्याय मिळतो. या पर्यायामध्ये जाऊन तुम्ही व्हॉल्यूम बटण हे 'झूम' (Zoom) साठी सेट करू शकता. यामुळे फोटो काढताना किंवा व्हिडिओ बनवताना स्क्रीनला स्पर्श न करता केवळ बटण दाबून झूम करणे सोपे होते. परंतु लक्षात ठेवा की जर तुम्ही हे बटण झूमसाठी सेट केले, तर एका वेळी ते एकच काम करेल; म्हणजेच त्यावेळी तुम्हाला या बटणाने फोटो क्लिक करता येणार नाही.
सकाळी वाजणारा अलार्म झटक्यात बंद किंवा स्नूज करणे
सकाळी झोपेतून उठण्यासाठी आपण सर्वजण अलार्म लावतो, पण बऱ्याचदा सुट्टीच्या दिवशीही सकाळी लवकर गजर वाजल्याने झोपमोड होते. अशा वेळी अर्धवट झोपेत स्क्रीन अनलॉक करून अलार्म बंद करणे कठीण जाते. यावर सुलभ उपाय म्हणजे अलार्मच्या सेटिंग्जमध्ये जाऊन व्हॉल्यूम बटणाचा पर्याय सेट करा. यामुळे अलार्म वाजताच व्हॉल्यूम बटण दाबून तुम्ही तो थेट बंद करू शकता किंवा 'स्नूज' (Snooze) वर टाकू शकता.