Almatti Dam Water Level Drop 2026 : पाच नद्यांचे उगमस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि उत्तर कर्नाटकसह सीमाभागासाठी वरदान ठरलेल्या विजयपूर जिल्ह्यात आता उन्हाळ्याच्या उत्तरार्धात भीषण जलसंकट उभे राहिले आहे. या संपूर्ण परिसरासाठी जीवनदायी असलेल्या प्रसिद्ध अलमट्टी धरणातील (Almatti Dam) पाणीसाठा झपाट्याने खाली आला असून सद्यस्थितीत तिथे केवळ 9 TMC पाणी शिल्लक राहिले आहे. अलमट्टी जलाशयातूनच विजयपूर आणि बागलकोट या जुळ्या जिल्ह्यांना मुख्यत्वे पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, धरणाचा तळ दिसू लागल्याने येथील नागरिकांमध्ये आणि प्रशासनामध्ये चिंतेचे ढग दाटले आहेत. हवामान खात्याने यंदा 15 जून रोजी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला असला, तरी तोपर्यंत मान्सूनची वाट पाहत मनुष्यबळ आणि पशुधनाला याच मर्यादित पाण्यावर दिवस काढावे लागणार आहेत.
भीमा नदी कोरडी ठणठणीत; 15 दिवसांतून एकदा मिळतोय पाणीपुरवठा
सध्या विजयपूर आणि बागलकोट या दोन्ही जिल्ह्यांमध्ये उन्हाचा प्रचंड भडका उडाला असून वातावरणातील आर्द्रता वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. धरणातील पाण्याची पातळी घटल्याने पाणीटंचाईची तीव्रता एवढी वाढली आहे की, सद्यस्थितीत अनेक गावांमध्ये आणि शहरांमध्ये आठवड्यातून अवघ्या एकदा, तर काही दुर्गम भागात थेट 15 दिवसांनंतर पाणी पुरवले जात आहे. परिस्थिती अधिक चिंताजनक बनण्याचे कारण म्हणजे विजयपूर जिल्ह्यातील भीमा नदीदेखील आता पूर्णपणे कोरडी पडली आहे. बेळगाव, विजयपूर आणि शेजारील बागलकोट जिल्ह्यातील लाखो लोक पिण्याच्या पाण्यासाठी पूर्णपणे कृष्णा नदी आणि अलमट्टीच्या पाणीसाठ्यावर अवलंबून असल्याने जून महिन्याचा काळ हा सर्वांसाठी अत्यंत कसोटीचा ठरणार आहे.
जूनमध्ये पाऊस हुलकावणी दिल्यास दोन्ही जिल्ह्यांत पाण्यासाठी संघर्षाची भीती
स्थानिक प्रशासनाकडून उपलब्ध असलेल्या 9 TMC पाण्यापैकी जास्तीत जास्त साठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवण्याचे नियोजन सुरू आहे. मात्र, जर जूनच्या मध्यात पावसाने वेळेवर हजेरी लावली नाही, तर विजयपूर आणि बागलकोट या जुळ्या जिल्ह्यांमध्ये पाण्यासाठी तीव्र संघर्ष किंवा टँकर युद्ध पेटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतीचा प्रश्न बाजूला राहिला असून आता केवळ माणसांना आणि मुक्या जनावरांना पिण्याचे पाणी कसे उपलब्ध करून द्यायचे, या विवंचनेत संपूर्ण प्रशासन अडकले आहे. उन्हाची तीव्रता कायम राहिल्यास पाण्याचे बाष्पीभवन होऊन जलसंकट अधिक तीव्र होण्याचा इशारा जलसंपदा विभागाच्या तज्ज्ञांनी दिला आहे.
हेही वाचा – DigiLocker Alert: डिजीलॉकर्स वापरकर्त्यांसाठी सरकारचा मोठा इशारा; 'या' एका चुकीमुळे बँक खातं होऊ शकतं रिकामं