Air India Negligence: एअर इंडियाच्या दिल्ली ते कॅनडा (व्हँकुव्हर) आंतरराष्ट्रीय उड्डाणाबाबत एक धक्कादायक निष्काळजीपणा समोर आला आहे. तांत्रिक मंजुरी नसलेले चुकीचे विमान या मार्गावर पाठवण्यात आल्याने, तब्बल 8 तास हवेत घालवल्यानंतर विमानाला पुन्हा दिल्लीत परतावे लागले. या प्रकारामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला असून, विमान कंपनीलाही मोठ्या इंधन खर्चाचा फटका बसला आहे.
नेमकी चूक काय झाली?
मिळालेल्या माहितीनुसार, व्हँकुव्हरला जाणाऱ्या AI185 या उड्डाणासाठी एअर इंडियाने 'बोईंग 777-200LR' या मॉडेलचा वापर केला होता. मात्र, नियमांनुसार एअर इंडियाकडे कॅनडाच्या हवाई हद्दीत प्रवेश करण्यासाठी केवळ 'बोईंग 777-300ER' या मॉडेलचीच अधिकृत मंजुरी उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे नियम विमानाचे मॉडेल आणि नोंदणी क्रमांकावर आधारित असतात. या निकषाचे उल्लंघन झाल्याचे लक्षात येताच सुरक्षेच्या कारणास्तव विमान माघारी फिरवण्यात आले.
चीनच्या सीमेवरून विमान फिरवले मागे
हे विमान गुरुवारी सकाळी 11:34 वाजता दिल्लीहून रवाना झाले होते. सुमारे चार तासांच्या प्रवासानंतर जेव्हा विमान चीनमधील कुनमिंग परिसरात पोहोचले, तेव्हा कंपनीला आपल्या चुकीची जाणीव झाली. कॅनडाच्या हवाई हद्दीत प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेला 'क्लिअरन्स' या विमानाकडे नसल्याचे स्पष्ट होताच तातडीने परतीचा निर्णय घेण्यात आला. एकूण 7 तास 54 मिनिटांचा प्रवास करून हे विमान सायंकाळी 7:19 वाजता पुन्हा दिल्लीत उतरले.
हेही वाचा – DGCA Warning Airlines : मोठा धोका! भारतीय एअरलाईन्ससाठी डीजीसीएने जारी केला अलर्ट, आता देशांच्या…
प्रवाशांची गैरसोय आणि कंपनीचे नुकसान
विमान दिल्लीला परतल्यानंतर सर्व प्रवाशांना सुखरूप उतरवण्यात आले. प्रवाशांच्या राहण्याची सोय हॉटेलमध्ये करण्यात आली असून दुसऱ्या दिवशी त्यांना योग्य विमानाने रवाना करण्यात आले. एअर इंडियाने या घटनेला 'कार्यवाहीशी संबंधित समस्या' असे म्हटले आहे. मात्र, या चुकीमुळे कंपनीला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे, कारण ही मोठी विमाने प्रति तास 8 ते 9 टन इंधनाचा वापर करतात.