Bomb Threat to Air India: एअर इंडियाच्या टोरंटोहून दिल्लीला येणाऱ्या एआय-188 विमानाला गुरुवारी बॉम्बची धमकी मिळाली. तथापी, विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असून, विमानाने दिल्लीच्या आयजीआय विमानतळावर दुपारी 3:40 वाजता सुरक्षितपणे लँडिंग केले. प्राप्त माहितीनुसार, दिल्ली पोलिसांना सकाळी विमानात संभाव्य बॉम्ब असल्याचा संदेश प्राप्त झाला. तत्काळ बॉम्ब थ्रेट असेसमेंट कमिटी (BTAC) सक्रिय करण्यात आली आणि परिस्थितीचे मूल्यांकन केले गेले. तपासानंतर अधिकाऱ्यांनी या धमकीला 'अस्पष्ट' (Non-specific) असे म्हटले आहे.
एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'उड्डाणादरम्यान सुरक्षा सतर्कतेचा इशारा मिळाल्यानंतर विमानातील कर्मचाऱ्यांनी सर्व सुरक्षा प्रोटोकॉलनुसार आवश्यक ती पावले उचलली. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. विमान सुरक्षितपणे उतरले असून प्रोटोकॉलनुसार त्याची तपासणी सुरू आहे,' असेही प्रवक्त्याने स्पष्ट केले.
विमानाचे लँडिंग केल्यानंतर सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितरीत्या खाली उतरवले गेले आहेत. सध्या विमानाची तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून देशातील विमानसेवांना बॉम्बच्या धमक्या देण्यात येत आहेत. बुधवारी मुंबई-वाराणसी एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला देखील बॉम्बची धमकी मिळाली होती, ज्यामुळे या विमानाचे वाराणसी विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
हेही वाचा – Delhi Blast Update: दिल्ली बॉम्बस्फोटाचा खरा सूत्रधार कोण? कट कोणी रचला? 'हे' मोठं नाव आलं समोर
तथापी, त्याच दिवशी इंडिगोला मिळालेल्या ईमेलमधून पाच भारतीय विमानतळांना लक्ष्य केल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे दिल्ली, मुंबई, चेन्नई, तिरुवनंतपुरम आणि हैदराबाद विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला असून, धमकी देणारे ईमेल कोणी पाठवले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.