Air India Delhi to London Flight AI111 Return Technical Snag : एअर इंडियाच्या दिल्ली ते लंडन जाणाऱ्या AI111 या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. गुरुवारी सकाळी सुमारे 6 वाजता दिल्लीहून झेपावलेले हे A350-900 विमान तब्बल 7 तास हवेत राहिल्यानंतर पुन्हा दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. विमानातून विचित्र आवाज ऐकू आल्याने वैमानिकाने खबरदारीचा उपाय म्हणून विमान मागे वळवण्याचा निर्णय घेतला. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन हा निर्णय घेण्यात आला असून आता विमानाची सखोल तपासणी केली जात आहे.
सौदी अरबच्या एअरस्पेसवरून विमान वळवले मागे
हे विमान दिल्लीहून उड्डाण केल्यानंतर सुमारे 4 तास प्रवास करून सौदी अरबच्या हवाई हद्दीत पोहोचले होते. त्याच वेळी तांत्रिक बिघाड झाल्याची शंका आल्याने विमान तातडीने माघारी वळवण्यात आले. दुपारी सुमारे 12:30 वाजता विमान दिल्लीत उतरले. एअर इंडियाने या घटनेबद्दल प्रवाशांची माफी मागितली असून, त्यांना दुसऱ्या विमानाने लंडनला पाठवण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, विमानातील एकूण प्रवाशांची निश्चित संख्या अद्याप समजू शकलेली नाही.
विमानाच्या सुरक्षेबाबत वाढल्या चिंता
ज्या VT-JRF नोंदणी क्रमांकाच्या A350 विमानाबाबत ही घटना घडली, त्यामध्ये यापूर्वी 15 मार्च रोजीही तांत्रिक बिघाड झाला होता. त्यावेळी न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या या विमानाला आयर्लंडमधील शॅनन शहरात आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते. अवघ्या काही दिवसांत दुसऱ्यांदा एकाच विमानात बिघाड झाल्याने एअर इंडियाच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे एअर इंडियाने ही अत्याधुनिक A350-900 विमाने जानेवारी 2024 पासूनच ताफ्यात सामील केली आहेत.
प्रवाशांना लवकरच लंडनला पाठवण्याचे आश्वासन
एअर इंडियाच्या व्यवस्थापनाने सांगितले की, प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल त्यांना खेद आहे. सर्व प्रवाशांना दिल्ली विमानतळावर आवश्यक सुविधा पुरवण्यात आल्या असून, त्यांना लवकरात लवकर लंडनला पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या विमानात आलेल्या तांत्रिक बिघाडाचे नेमके स्वरूप काय होते, याचा तपास तांत्रिक पथकाकडून केला जात आहे. आधुनिक विमानांमध्ये अशा प्रकारे वारंवार बिघाड होणे हे एअर इंडियासाठी चिंतेची बाब ठरत आहे.