Russia-Ukraine War: अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात रविवारी होणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीच्या पूर्वसंध्येला रशियाने युक्रेनवर मोठा लष्करी हल्ला चढवला आहे. शनिवारी पहाटे रशियाने राजधानी कीवसह युक्रेनच्या विविध भागांना क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने लक्ष्य केले. या हल्ल्यामुळे युक्रेनची संपूर्ण वीज यंत्रणा कोलमडली असून राजधानी कीव अंधारात बुडाली आहे.
शांतता चर्चेवर युद्धाचे सावट
फ्लोरिडातील मार-ए-लागो येथे ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात शांती योजनेवर चर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर झालेला हा हल्ला युक्रेनवर दबाव वाढवण्यासाठी रशियाने वापरलेली युक्ती असल्याचे मानले जात आहे. ट्रम्प यांच्या 20 कलमी शांतता योजनेवर जनमत चाचणी घेण्यासाठी किमान 60 दिवसांची युद्धबंदी आवश्यक असल्याचे झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले होते. रशियाला ही युद्धबंदी कमी कालावधीसाठी हवी आहे. चर्चेच्या टेबलावर बसण्यापूर्वी रशिया आपली ताकद दाखवून युक्रेनला अटी मान्य करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करत आहे.
ऊर्जा क्षेत्राला मोठा फटका
रशियन हल्ल्यामुळे युक्रेनमधील महत्त्वाच्या ऊर्जा प्रकल्पांचे नुकसान झाले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर वीजपुरवठा खंडित झाला असून कडाक्याच्या थंडीत नागरिकांचे हाल होत आहेत. युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणेने अनेक ड्रोन पाडले असले तरी, क्षेपणास्त्र हल्ल्यांनी शहराचे मोठे नुकसान केले आहे. जीवितहानीबाबतची अधिकृत माहिती अद्याप हाती आलेली नाही.
????? BREAKING: RUSSIA LAUNCHES MASSIVE MISSILE STRIKE ON KYIV HOURS AFTER ZELENSKY SAID HE'S READY TO HOLD REFERENDUM ON TRUMP'S PEACE PLAN The Ukrainian capital came under massive attack early Saturday, with air defenses in operation and large-scale power outages hitting the… pic.twitter.com/SNb68IIN5W — Mario Nawfal (@MarioNawfal) December 27, 2025
ट्रम्प यांची ‘शांती योजना’ 90 टक्के पूर्ण
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि युक्रेन यांच्यातील सुरक्षा कराराचा सुमारे 90 टक्के भाग अंतिम झाला आहे. या योजनेचे पाच महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे. सुरक्षा हमींचे मुद्दे निकाली निघाले असले तरी, ‘डोनबास’ प्रदेशाच्या ताब्यावरून अद्याप दोन्ही देशांमध्ये मतभेद कायम आहेत. उद्या होणाऱ्या ट्रम्प-झेलेन्स्की भेटीत या युद्धाला पूर्णविराम मिळणार की संघर्ष अधिक पेटणार, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.