Celebrity Harassment : महिला कलाकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयसोबत घडलेल्या गैरवर्तनाची घटना ताजी असतानाच, आता प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि माजी खासदार मिमी चक्रवर्ती यांनीही सार्वजनिक छळाचा आरोप केला आहे. उत्तर 24 परगणा येथील बनगावमध्ये एका कार्यक्रमादरम्यान घडलेल्या या प्रकारानंतर मिमीने आयोजकांविरुद्ध कायदेशीर लढाई सुरू केली आहे.
नेमकी घटना काय?
मिमी चक्रवर्ती एका लाईव्ह परफॉर्मन्ससाठी बनगाव येथे गेली होती. तिथे तिला केवळ सार्वजनिक छळाचाच सामना करावा लागला नाही, तर कार्यक्रमाच्या मध्यभागी तिला स्टेज सोडण्यास भाग पाडण्यात आले. मिमीने सोशल मीडियावर चाहत्यांच्या पोस्ट शेअर करत या घटनेचा खुलासा केला. तिने सांगितले की, एका कलाकाराचा आदर राखून ती 20 मिनिटे स्टेजच्या मागे वाट पाहत उभी होती, तरीही तिच्यावर निराधार आरोप करण्यात आले आणि तिचा अपमान करण्यात आला.
“गप्प बसणार नाही!” – मिमीचा खंबीर पवित्रा
मिमीने याप्रकरणी पोलिस ठाण्यात FIR दाखल केला आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले, “महिला कलाकारांनी सर्व काही सहन करून गप्प राहावे अशी लोकांची अपेक्षा असते. जर आपण आवाज उठवला, तर आपल्याला ‘कठीण’ (Difficult) असे लेबल लावले जाते. मी माझे करिअर स्वाभिमानाने आणि मेहनतीने घडवले आहे. ही कायदेशीर कारवाई सूड घेण्यासाठी नाही, तर जबाबदारी निश्चित करण्यासाठी आहे.”
मौनी रॉयसोबतही घडला होता असाच प्रकार
काही दिवसांपूर्वी मौनी रॉयने हरियाणातील करनाल येथील आपला थरकाप उडवणारा अनुभव शेअर केला होता. एका व्यक्तीने फोटो काढण्याच्या बहाण्याने तिच्याशी अश्लील चाळे केले, तर स्टेजवर सादरीकरण करत असताना काही पुरुषांनी अश्लील कमेंट्स आणि शिवीगाळ केली. या प्रकारामुळे मौनीने कार्यक्रम अर्धवट सोडला होता. एकामागून एक घडणाऱ्या या घटनांमुळे महिला कलाकारांच्या सुरक्षेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
अभिनेत्री ते खासदार
मिमी चक्रवर्ती ही बंगाली चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 2012 मध्ये ‘बापी बारी जा’ या चित्रपटातून तिने पदार्पण केले होते. अभिनयासोबतच तिने राजकारणातही ठसा उमटवला असून, 2019 ते 2024 या काळात ती जादवपूर मतदारसंघाची खासदार होती. तिचा अलीकडील ‘भानुप्रिया भूतेर हॉटेल’ हा चित्रपट बराच चर्चेत आहे.