Pakistan Afghanistan War: अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाने आता सशस्त्र संघर्षाचे रूप घेतले आहे. पाकिस्तानकडून झालेल्या हवाई हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात अफगाण सैन्याने पाकिस्तानवर तीव्र कारवाई केली असून, यात 58 पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून 30 हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. शिवाय, 25 पाकिस्तानी लष्करी चौक्या अफगाण सैन्याने ताब्यात घेतल्या असल्याची माहिती अफगाण अधिकाऱ्यांनी दिली आहे. अफगाणिस्तानच्या हेलमंड प्रांतातील माहिती आणि संस्कृती संचालक रशीद हेलमंडी यांनी टोलो न्यूजला सांगितले की, हेलमंडमधील बहरामचा परिसरात अफगाण सुरक्षा दलांनी शकीझ, बीबी जानी आणि सालेहान या भागांमध्ये तीन तास कारवाई केली. या कारवाईदरम्यान पाकिस्तानी सैन्याची शस्त्रे, रायफल्स, नाईट व्हिजन स्कोप आणि एक मृतदेह जप्त करण्यात आला. अफगाण सैन्याच्या म्हणण्यानुसार, ही कारवाई पाकिस्तानकडून अफगाण हद्दीत वारंवार घुसखोरी आणि हवाई हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात करण्यात आली.
अलीकडेच पाकिस्तानने 9 ऑक्टोबर रोजी काबूल, खोस्त, जलालाबाद आणि पक्तिका येथे हवाई हल्ले केले होते. त्यावेळी त्यांनी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) प्रमुख नूर वली मेहसूद याला लक्ष्य केले असल्याचे सांगितले होते. त्यानंतर अफगाणिस्तानकडून झालेला हा प्रतिहल्ला पाकिस्तानसाठी मोठा धक्का ठरला आहे. अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचे प्रवक्ते जबिहुल्लाह मुजाहिद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आमच्या सीमांचे उल्लंघन सहन केले जाणार नाही. पाकिस्तानकडून पुन्हा हल्ला झाल्यास अधिक कठोर प्रत्युत्तर दिले जाईल.
हेही वाचा – Pakistan Afghanistan War: पाक-अफगाणिस्तान वाद टोकाला; पाकिस्तानच्या बाजूने उभा राहणार 'हा' मुस्लिम देश
दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत देशाच्या संरक्षणाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा इशारा दिला आहे. त्यांनी तालिबान सरकारवर दहशतवादी संघटनांना अफगाण भूमी वापरण्याची परवानगी देत असल्याचा आरोप केला आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सीमावाद आणि टीटीपीचा मुद्दा हा या संघर्षाचा मुख्य केंद्रबिंदू मानला जातो.
हेही वाचा – Russia US Deal: भारतासाठी धोक्याची घंटा? पुतिन-ट्रम्प जवळ आले, रशिया-अमेरिकेतील नव्या कराराची तयारी
अमेरिकास्थित ‘आर्म्ड कॉन्फ्लिक्ट लोकेशन अँड इव्हेंट डेटा प्रोजेक्ट (ACLED)’ च्या अहवालानुसार, फक्त 2024 मध्येच टीटीपीने पाकिस्तानमध्ये 600 हून अधिक हल्ले केले होते. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील तणाव अधिक तीव्र होत असून, या नव्या संघर्षामुळे दक्षिण आशियातील सुरक्षा परिस्थिती गंभीर वळणावर गेली आहे.