Abhijeet Dipke: देशभरात गाजत असलेल्या NEET परीक्षा पेपरफुटीच्या वादळामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या नैराश्यावर 'कॉकरोच जनता पार्टी'चे प्रमुख अभिजीत दीपके यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून एक महत्त्वाची आणि मोठी मागणी केली आहे. या पेपरफुटीच्या धक्कादायक प्रकारामुळे मानसिक तणावातून ज्या विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवले आहे, त्यांच्या शोकाकुल कुटुंबीयांना सरकारने तातडीने 1 कोटी रुपयांची आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, अशी आग्रही विनंती दीपके यांनी पत्राद्वारे केली आहे.
केवळ 48 तासांत 5 घटना; दीपके यांनी व्यक्त केली तीव्र चिंता
पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात अभिजीत दीपके यांनी देशातील तरुणांच्या मानसिक आरोग्यावर आणि भविष्यावर होत असलेल्या विदारक परिणामांकडे लक्ष वेधले आहे. अत्यंत जड अंतःकरणाने हे पत्र लिहीत असल्याचे नमूद करत त्यांनी दावा केला आहे की, गेल्या अवघ्या एका आठवड्यात NEET ची तयारी करणाऱ्या 11 परीक्षार्थींनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. यातही अत्यंत क्लेशदायक बाब म्हणजे, यातील 5 हृदयद्रावक घटना तर गेल्या अवघ्या 48 तासांच्या कालावधीत घडल्या आहेत. वारंवार समोर येणाऱ्या परीक्षांच्या घोटाळ्यांमुळे विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे उडाला असून ते प्रचंड मानसिक दडपणाखाली वावरत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
शैक्षणिक कर्जाच्या ओझ्याखाली बाधित कुटुंबे आर्थिक संकटात
गेल्या 2 महिन्यांत अशा अनेक दुर्दैवी कुटुंबांची वैयक्तिक भेट घेतल्याचे दीपके यांनी पत्रात म्हटले आहे. आपल्या पोटच्या गोळ्याला गमावल्याच्या असह्य दुःखासोबतच ही कुटुंबे आता मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे म्हणून यातील अनेक पालकांनी बँकांकडून मोठी शैक्षणिक कर्जे घेतली होती, मात्र व्यवस्थेच्या निष्काळजीपणामुळे ही स्वप्ने धुळीस मिळाली आहेत. आयुष्यभराची पुंजी पणाला लावूनही मुले हातातून गेल्याने ही कुटुंबे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे सरकारने आतातरी या गंभीर परिस्थितीत संवेदनशील होऊन प्रत्येक पीडित कुटुंबाला 1 कोटी रुपयांचे साहाय्य करावे, असे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.
हेही वाचा – Telegram Ban: मोठी बातमी! उच्च न्यायालयाचा टेलिग्रामला दणका, 'या' तारखेपर्यंत बंदी राहणार कायम
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
देशातील शिक्षण व्यवस्थेचे हे अपयश अधोरेखित करत अभिजीत दीपके यांनी थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर निशाणा साधला आहे. गेल्या 1 महिन्यापासून 'कॉकरोच जनता पार्टी' शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी देशभरात आंदोलने करत असल्याचे त्यांनी सांगितले. या जीवितहानीची नैतिक जबाबदारी निश्चित होणे गरजेचे आहे, असे सांगत दीपके यांनी वारंवार होणारे प्रशासकीय गोंधळ हे शिक्षण व्यवस्था कोलमडल्याचे लक्षण असल्याचे म्हटले आहे. शिक्षणमंत्री हे पंतप्रधानांच्या इच्छेनुसार काम करत असल्याने, पंतप्रधानांनी अंतिम निर्णय घेत धर्मेंद्र प्रधान यांना तातडीने त्यांच्या पदावरून हटवावे, अशी मागणीही त्यांनी या पत्राच्या शेवटी केली आहे.