MRP Violation: हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये पिण्याच्या पाण्याच्या बाटलीवर छापील किमतीपेक्षा (MRP) जास्त पैसे आकारणे आता व्यावसायिकांना चांगलेच महागात पडू शकते. चंदीगडमधील एका रेस्टॉरंटने 20 रुपयांच्या पाण्याच्या बाटलीसाठी ग्राहकाकडून 55 रुपये वसूल केले होते. या प्रकरणी चंदीगड राज्य ग्राहक वाद निवारण आयोगाने (SCDRC) ऐतिहासिक निकाल देत रेस्टॉरंटला 3,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
दरम्यान, 12 डिसेंबर 2023 रोजी रात्री 8:30 वाजता एक महिला ग्राहक चंदीगडमधील एका रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेली होती. जेवणानंतर आलेल्या 1,922 रुपयांच्या बिलात 20 रुपये MRP असलेल्या पाण्याच्या बाटलीसाठी चक्क 55 रुपये आकारण्यात आले होते. या अवाजवी दरामुळे धक्का बसलेल्या ग्राहकाने ग्राहक मंचाकडे धाव घेतली. विशेष म्हणजे, जिल्हा आयोगाने सुरुवातीला तक्रार फेटाळली होती, मात्र हार न मानता या महिलेने वकिलाशिवाय स्वतःचा खटला राज्य आयोगासमोर लढवला आणि विजय मिळवला.
रेस्टॉरंटचा युक्तिवाद आयोगाने फेटाळला
रेस्टॉरंटने असा युक्तिवाद केला होता की, तेथील उत्तम वातावरण, एअर कंडिशनिंग (AC) आणि विशेष सेवांमुळे त्यांनी बाटलीची किंमत जास्त आकारली. मात्र, आयोगाने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला. 'रेस्टॉरंटला त्यांच्या स्वतःच्या अन्नाची किंमत ठरवण्याचे स्वातंत्र्य आहे, परंतु प्री-पॅकेज्ड वस्तू जसे की पाण्याची बाटली किंवा कोल्ड ड्रिंक्स यांच्यावर Legal Metrology Rules, 2011 लागू होतात. एमआरपीमध्ये आधीच सर्व कर, पॅकेजिंग आणि नफ्याचा समावेश असतो, त्यामुळे त्यावर अतिरिक्त शुल्क आकारणे बेकायदेशीर आहे,' असे आयोगाने स्पष्ट केले.
ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण संदेश
हा निकाल देशभरातील ग्राहकांच्या हक्कांना बळकटी देणारा ठरला आहे. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना आता स्पष्ट संदेश गेला आहे की, सेवेच्या किंवा वातावरणाच्या नावाखाली पॅकेज्ड उत्पादनांवर छापील किमतीपेक्षा जास्त पैसे घेणे हा कायद्याचा भंग आहे. ग्राहक न्यायालयाचा हा निर्णय आता अशा प्रकारच्या लूटमारीला लगाम घालणारा ठरेल.