Delhi Blast Update: राजधानीतील लाल किल्ला स्फोट प्रकरणात तपास यंत्रणांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. केस डायरीतील नोंदीनुसार, दहशतवादी मोठ्या प्रमाणात विध्वंस घडवण्यासाठी एसीटोन आणि पावडर साखर यांचा वापर करून स्फोटके तयार करत होते. फरीदाबादमधून जप्त केलेल्या साहित्याचा मुख्य सूत्रधार डॉ. उमर मोहम्मद असल्याचे स्पष्ट झाले असून त्याचा मृत्यू आधीच झाला आहे. उमर हा जैश-ए-मोहम्मदशी संलग्न, अत्यंत प्रशिक्षित दहशतवादी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
अटकेत असलेला मुझम्मिल यांनी दिलेल्या कबुलीनुसार, उमर स्वतःला “अमीर” म्हणजेच सेनापती किंवा शासक असे संबोधत असे. धर्म, कट्टरता आणि वैचारिक भाषणांमधून तो आपल्या सहकाऱ्यांवर प्रभाव टाकत असे. हिंदी, उर्दू, इंग्रजी, अरबी, फारसी, चिनी आणि फ्रेंचसह नऊपेक्षा अधिक भाषा त्याला अवगत होत्या. स्वतःला राजकीय-धार्मिक नेता समजणारा उमर, आपल्या आसपासच्या सर्वांना नियंत्रणात ठेवत असे, असे मुझम्मिलने सांगितले. मुझम्मिलने सांगितले की उमर प्रत्येक वेळी धर्म, अन्याय आणि देशातील ध्रुवीकरणाबद्दल बोलून गटातील सदस्यांना मानसिकरीत्या प्रभावीत करत असे. त्याला जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीबाबत तीव्र संताप होता आणि कलम 370 रद्द झाल्यानंतर त्याची कट्टरता आणखी वाढल्याचे सांगण्यात येते.
अल फलाह विद्यापीठातील खोलीतच सुरु होती स्फोटकांची चाचणी
उमर मेवातमधील नूह येथून युरिया आणून विद्यापीठातील आपल्या खोलीत स्फोटके बनवण्याची प्रयोगशाळा उभारत असे. फरीदाबादमध्ये जमवलेल्या स्फोटकांसह जम्मू-काश्मीरमध्ये “मोठा हल्ला” करण्याचा त्याचा प्लॅन होता, असे मुझम्मिलने कबूल केले.
पाच जणांचे दहशतवादी मॉड्युल
उमर, मुझम्मिल, आदिल, शाहीन आणि मुफ्ती इरफान हे पाच जण एकत्रितपणे या मोठ्या दहशतवादी कारवाईचा कट रचत होते. संवादासाठी उमरने चिनी भाषेत एक गुप्त गट तयार केला होता. त्याचे नेतृत्वही तो स्वतःच करत होता. गटातील सर्व संभाषणे केवळ चिनी भाषेत होत होती.
हेही वाच – Voter List Names: पश्चिम बंगाल आणि मुंबईच्या मतदार यादीत मोठी विसंगती; निवडणूक आयोगाचा अहवाल
व्यक्तिगत नात्यांमधून जुळले दहशतवादी संबंध
मुझम्मिलने सांगितले की, शाहीनशी असलेले त्याचे वैयक्तिक संबंध या गटात त्याचा प्रवेश होण्याचे कारण ठरले. शाहीन सौदी अरेबियात अध्यापन करत असून तिच्या खात्यातून सुमारे 25 लाख रुपये या मॉड्युलला पुरवण्यात आल्याचा आरोप आहे. प्रशिक्षणासाठी उमर आणि मुझम्मिल काही काळ तुर्कीतही राहिले होते, जिथे त्याचा संपर्क “उकासा” या कोड नावाने ओळखल्या जाणाऱ्या हँडलर्सशी झाला. तपास पथकाने जप्त केलेल्या उमरच्या सुटकेसमध्ये स्फोटक साहित्य, चिनी भाषेतील कागदपत्रे, तसेच कटाशी संबंधित अनेक पुरावे मिळाल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण कटाच्या उघडकीमुळे सुरक्षा यंत्रणांनी सावधगिरीचा इशारा दिला असून, मॉड्युलमधील इतर सदस्यांची कसून चौकशी सुरू आहे.