Nitin Borkar Death : मराठी मनोरंजन विश्वावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या कल्पकतेने पडद्यावरील दृश्ये जिवंत करणारे नामवंत कला दिग्दर्शक नितीन बोरकर यांचे 18 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. ब्रेन स्ट्रोकशी सुरू असलेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीने एक अभ्यासू आणि सर्जनशील तंत्रज्ञ गमावला आहे.
उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत
प्राप्त माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी नितीन बोरकर यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने नवी मुंबईतील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हेही वाचा – AI Project 'Bal Tanhaji' : चित्रपटाचा प्रीक्वल AI मध्ये; अजय देवगण घेऊन येत आहेत 'बाल तान्हाजी'!
पडद्यामागचा किमयागार
नितीन बोरकर यांनी गेल्या अनेक वर्षांत आपल्या कलेचा ठसा उमटवला होता. त्यांनी आतापर्यंत 40 पेक्षा जास्त चित्रपटांसाठी कला दिग्दर्शन केले होते. यामध्ये 'बॉईज 3', 'राजवाडे अँड सन्स' आणि 'दगडाबाईची चाळ' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. 'मी वसंतराव' या चरित्रात्मक चित्रपटात त्यांनी उभ्या केलेल्या काळानुरूप सेटचे मोठे कौतुक झाले होते. तसेच 'ती आणि ती' या सिनेमातही त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. केवळ चित्रपटच नव्हे, तर मराठी नाटकांच्या नेपथ्यातही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता.
कलाविश्वातून हळहळ
दरम्यान, नितीन बोरकर यांच्या जाण्याने तंत्रज्ञ आणि कलाकारांमध्ये शोककळा पसरली आहे. "पडद्यामागचा एक मोठा आधारस्तंभ निखळला," अशा शब्दांत अनेक दिग्गजांनी सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मनोरंजन विश्वासाठी हा काळ कठीण असून, काही दिवसांपूर्वीच 'जर तर ची गोष्ट'चे दिग्दर्शक रणजित पाटील यांचेही निधन झाले होते. या लागोपाठच्या धक्क्यांमुळे मराठी इंडस्ट्रीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.