Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या क्रान्स-माँटाना (Crans-Montana) स्की रिसॉर्टमध्ये गुरुवारी पहाटे भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाला असून, मोठ्या संख्येने पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या पर्यटकांच्या उत्साहावर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट गुरुवारी पहाटे स्थानिक वेळेनुसार 1:30 वाजता एका आलिशान आल्पाइन स्की रिसॉर्टमधील बारमध्ये झाला. स्वित्झर्लंडच्या सिएर जिल्ह्यात असलेले हे रिसॉर्ट पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती.
बचावकार्य आणि मृतांचा आकडा
दक्षिण-पश्चिम स्वित्झर्लंडमधील वालिस कँटनचे पोलीस प्रवक्ते गॅटन लॅथिऑन यांनी घटनेची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, अज्ञात कारणांमुळे हा स्फोट झाला असून यामध्ये अनेक जणांनी आपला जीव गमावला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचा निश्चित आकडा अद्याप समजू शकलेला नाही.
An explosion followed by a fire ripped through a bar in the Swiss resort town of Crans-Montana, killing several people and leaving others critically injured, police said. pic.twitter.com/XjH7NkjPkS — Open Source Intel (@Osint613) January 1, 2026
तपास सुरू
दरम्यान, हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले असून स्फोटाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. क्रान्स-माँटाना हे ठिकाण राजधानी बर्नपासून सुमारे दोन तासांच्या अंतरावर आहे. हिवाळी पर्यटनासाठी हे जगभरातील पर्यटकांचे आवडीचे केंद्र मानले जाते.