Indian Railways: रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यावधी प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. तिकीट बुकिंगची प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक करण्यासाठी भारतीय रेल्वे ऑगस्ट 2026 पासून आपली नवीन 'पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम' (PRS) टप्प्याटप्प्याने लागू करणार आहे. ही आधुनिक प्रणाली 1986 पासून म्हणजे तब्बल 4 दशकांपासून वापरात असलेल्या जुन्या आरक्षण व्यवस्थेची जागा घेणार आहे. रेल्वेच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा तांत्रिक बदल मानला जात आहे.
रिकामी जागा लगेच दिसणार ऑनलाइन
या नवीन सुधारेल प्रणालीमुळे प्रवाशांना धावत्या ट्रेनमध्येही कन्फर्म तिकीट मिळणे शक्य होणार आहे. यासाठी रेल्वे तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना (TTE) दिलेल्या हँड-हेल्ड टर्मिनल्स (HHT) मध्ये मोठे बदल केले जात आहेत. जर एखादा कन्फर्म तिकीट असलेला प्रवासी त्याच्या नियोजित स्थानकावरून ट्रेनमध्ये चढला नाही, तर TTE त्याची जागा रिकामी असल्याचे HHT वर नोंदवतील. ही माहिती अपडेट होताच ती जागा IRCTC च्या वेबसाइटवर उपलब्ध होईल; ज्यामुळे पुढील स्थानकांवरील वेटिंग लिस्ट असलेल्या प्रवाशांना लगेचच कन्फर्म तिकीट बुक करता येईल.
RAC आणि वेटिंग लिस्ट असलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा
पूर्वीचा नियम असा होता की, एखादा प्रवासी ट्रेनमध्ये चढला नाही तरी टीटीई पुढील 2 स्थानकांपर्यंत त्या जागेसाठी वाट पाहत असत. मात्र, आता नव्या नियमांमुळे RAC (Reservation Against Cancellation) आणि वेटलिस्टेड प्रवाशांना तात्काळ रिकामी जागा मिळण्यास मदत होईल. सध्या रेल्वेमधील एकूण बुकिंगपैकी जवळपास 88 टक्के तिकिटे ऑनलाइन बुक केली जातात. हीच डिजिटल गरज ओळखून रेल्वेने सर्व्हरवरील ताण कमी करण्यासाठी आणि पीक सीजनमध्ये बुकिंगचा वेग वाढवण्यासाठी ही सिस्टीम तयार केली आहे.
हेही वाचा – FD करायचीय? SBI, PNB सह देशातील 5 मोठ्या बँकांचे नवीन व्याजदर जाहीर; कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
तिकीट कन्फर्म होणार की नाही? आता 'AI' सांगणार अचूक अंदाज
या नवीन प्लॅटफॉर्मचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) वर आधारित 'वेटलिस्ट प्रेडिक्शन टूल'चा वापर करण्यात आला आहे. याद्वारे प्रवाशांना त्यांच्या प्रतीक्षा यादीतील तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता किती टक्के आहे, याचा अचूक अंदाज आधीच समजू शकेल. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संपूर्ण डिजिटल स्थलांतरादरम्यान प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.