72nd National Film Awards 2026: 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; कार्तिक आर्यनसह ‘या’ अभिनेत्रीने मारली बाजी

72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शनिवारी, 18 जुलै रोजी सायंकाळी 5:30 वाजता नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटरमधून करण्यात आली.

72nd National Film Awards 2026: 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; कार्तिक आर्यनसह ‘या’ अभिनेत्रीने मारली बाजी

72nd National Film Awards 2026: चित्रपटसृष्टीत मानाच्या समजल्या जाणाऱ्या 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शनिवारी, 18 जुलै रोजी सायंकाळी 5:30 वाजता नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटरमधून करण्यात आली. वर्ष 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या उत्कृष्ट चित्रपटांचा आणि कलाकारांचा गौरव या सोहळ्यात करण्यात आला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या या अधिकृत घोषणा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पीआयबी (PIB) इंडियाच्या यूट्यूब वाहिनीवर करण्यात आले. 

यंदाच्या पुरस्कारांमध्ये राजकुमार राव मुख्य भूमिकेत असलेल्या ‘श्रीकांत’ सिनेमाला सर्वोत्तम हिंदी चित्रपटाचा मान मिळाला आहे, तर यामी गौतमच्या दमदार अभिनयाने सजलेल्या ‘आर्टिकल 370’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.

यामी गौतम ठरली सर्वोत्तम अभिनेत्री
अभिनय क्षेत्रात यंदा कार्तिक आर्यन आणि दिग्गज अभिनेते ममूटी यांनी संयुक्तपणे बाजी मारत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावावर केला. कार्तिक आर्यनला ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटातील अष्टपैलू अभिनयासाठी, तर ममूटी यांना ‘ब्रह्मयुगम’ या चित्रपटातील उत्कृष्ट कामासाठी गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, यापूर्वी जून 2026 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ममूटी यांना ‘पद्मभूषण’ या नागरी सन्मानाने देखील गौरविण्यात आले होते. दुसरीकडे, ‘आर्टिकल 370’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या यामी गौतमने आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा किताब पटकावला.

प्रादेशिक चित्रपटांमध्ये ‘मुक्कम पोस्ट बोंबिलवाली’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
प्रादेशिक भाषांमधील उत्कृष्ट चित्रपटांचा गौरव करताना विविध भाषांमधील विजेते जाहीर करण्यात आले. यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतून ‘मुक्कम पोस्ट बोंबिलवाली’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत धनुष दिग्दर्शित ‘रायन’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट तमिळ, ‘कमिटी कुर्रोलू’ला सर्वोत्कृष्ट तेलुगू आणि ‘फेमिनिची फातिमा’ला सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपटाचा बहुमान मिळाला. याशिवाय कन्नडमध्ये ‘मिथ्या’, तुलू भाषेत ‘इम्बू’, ओडियामध्ये ‘लहरी’, गुजरातीमध्ये ‘मारन’, कोकणीत ‘मोग असुम’ आणि मणिपुरी भाषेत ‘सुनीता’ या चित्रपटांनी आपापल्या श्रेणीत बाजी मारली.

राजकुमार पेरियासामी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक 
चित्रपटाच्या तांत्रिक आणि सहाय्यक भूमिकांसाठीही महत्त्वाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले. ‘अमरन’ चित्रपटासाठी राजकुमार पेरियासामी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. ‘भक्त’ सिनेमासाठी संजय मिश्रा यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, तर ‘मिथ्या’साठी रूपश्री वरकाडी आणि ‘महाराजा’साठी सचना नमिदास यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

हेही वाचा –  KBC 18 Premiere: ‘कौन बनेगा करोडपती 18’ च्या प्रीमियरची तारीख जाहीर; अमिताभ बच्चन यांचे धमाकेदार पुनरागमन

तांत्रिक बाजूंचा विचार करता, ‘पुष्पा 2’ या चित्रपटाने वेशभूषा (दीपावली नूर आणि शीतल कुमार) आणि सर्वोत्कृष्ट पटकथा (बंदरड्डी सुकुमार) असे 2 महत्त्वाचे पुरस्कार पटकावले. यासोबतच ‘ब्रमयुगम’साठी शहनाद जलाल (सर्वोत्कृष्ट छायांकन), ‘स्त्री 2’ मधील ‘आज की रात’ गाण्यासाठी विजय गांगुली (सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन), ‘आर्टिकल 370’साठी शाश्वत सचदेव (सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन) आणि ‘कल्की 2898 एडी’साठी नितीन चौधरी (सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन) यांना सन्मानित करण्यात आले.

दरम्यान, ‘भूल भुलैया 3’ ला सर्वोत्कृष्ट साउंड डिझाईन, वेंकी अटलुरी यांना ‘लकी भास्कर’साठी सर्वोत्कृष्ट संवाद लेखक आणि मनोज मुंतशीर यांना ‘जाने दो’ गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number