Amazon Investment in India: भारतीय बाजारपेठेत आपला विस्तार अधिक मजबूत करण्यासाठी जागतिक ई-कॉमर्स दिग्गज ॲमेझॉनने एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अँडी जस्सी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या महत्त्वाकांक्षी योजनेची माहिती दिली. ॲमेझॉन 2026 ते 2030 या कालावधीत भारतात सुमारे 4.5 लाख कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीच्या माध्यमातून देशात तब्बल 38 लाख नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीचा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर शेअर करत अँडी जस्सी यांनी भारताच्या डिजिटल प्रवासातील या भागीदारीबद्दल आनंद व्यक्त केला.
AI आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरवर विशेष भर
ॲमेझॉनच्या या महागुंतवणुकीतील एक मोठा हिस्सा आधुनिक तंत्रज्ञानासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. कंपनी 2030 पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरच्या विस्तारासाठी अतिरिक्त 13 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असून, यामुळे या क्षेत्रातील एकूण गुंतवणूक 21 अब्ज डॉलर्सच्या पुढे जाईल. ‘ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस’ (AWS) अंतर्गत मुंबई आणि हैदराबादमधील डेटा सेंटर्सचे जाळे अधिक सक्षम केले जाणार आहे. याचा थेट फायदा देशातील स्टार्टअप्स, मोठे उद्योग आणि सरकारी संस्थांना सुरक्षित क्लाउड तंत्रज्ञान, डेव्हलपर टूल्स आणि प्रगत AI सेवा मिळवण्यासाठी होईल.
हेही वाचा – Stock Market Holiday: उद्यापासून सलग 3 दिवस शेअर बाजार बंद; काय आहे नेमकं कारण? वाचा
लघु उद्योगांचे सक्षमीकरण आणि निर्यातीचे उद्दिष्ट
ॲमेझॉनने 2030 पर्यंत देशातील 1.5 कोटी लघु व्यवसायांना डिजिटल व्यासपीठ मिळवून देण्याचे आणि 80 अब्ज डॉलर्सची ई-कॉमर्स निर्यात साध्य करण्याचे ध्येय ठेवले आहे. याशिवाय, ग्रामीण भागातील विकासावर भर देत 40 लाख सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत AI तंत्रज्ञानाचे फायदे पोहोचवले जातील. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आतापर्यंत भारतातील 1.2 कोटी छोट्या उद्योगांचे डिजिटलायझेशन पूर्ण केले असून, 20 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मूल्याची निर्यात शक्य केली आहे. तसेच, 1 कोटीहून अधिक भारतीयांना क्लाउड तंत्रज्ञानाचे कौशल्य प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
A great meeting with Mr. Andy Jassy. I welcome Amazon's record $48 billion investment in India. This will create new opportunities for our youth. At the same time, it shows the growing interest across the world to invest in India!@amazon https://t.co/emr6Dd9Cps — Narendra Modi (@narendramodi) June 25, 2026
डिलिव्हरी नेटवर्कचा विस्तार आणि ‘सन्मान’ उपक्रम
ई-कॉमर्स आणि क्विक-कॉमर्स क्षेत्रात आपले स्थान अधिक बळकट करण्यासाठी ॲमेझॉन चालू वर्षभरात देशभरात 20 हून अधिक नवीन ‘फुलफिलमेंट सेंटर्स’ (साठवणूक केंद्रे) आणि 100 पेक्षा जास्त नवीन ‘लास्ट-माईल डिलिव्हरी स्टेशन्स’ सुरू करणार आहे. यामुळे प्रामुख्याने टियर-3 आणि टियर-4 शहरांमधील ग्राहकांना अतिशय जलद गतीने डिलिव्हरी सेवा मिळेल. याच सोबतीला, डिलिव्हरी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आणि सुरक्षेसाठी कंपनीने ‘सन्मान’ (Samman) नावाचा एक विशेष कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. 2010 ते 2030 या दोन दशकांच्या काळात ॲमेझॉनची भारतातील एकूण गुंतवणूक 88 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडणार आहे.