Heavy Rainfall : 142 जणांचा मृत्यू, 797 कोटींचे नुकसान… मुसळधार पावसामुळे ‘या’ राज्यात शेकडो कुटुंबांचे संसार उघड्यावर

ताज्या अहवालानुसार, 30 जून ते 6 ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टी, दरडी कोसळणे आणि रस्ते अपघातांमुळे एकूण 142 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.

Heavy Rainfall : 142 जणांचा मृत्यू, 797 कोटींचे नुकसान… मुसळधार पावसामुळे ‘या’ राज्यात शेकडो कुटुंबांचे संसार उघड्यावर

Heavy Rainfall  :  हिमाचल प्रदेशात यंदाच्या मान्सूनच्या काळात प्रचंड नैसर्गिक आपत्ती पाहायला मिळत आहे. राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाच्या (SEOC) ताज्या अहवालानुसार, 30 जून ते 6 ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टी, दरडी कोसळणे आणि रस्ते अपघातांमुळे एकूण 142 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून 224 जण गंभीर जखमी झाले आहेत. या मान्सूनमुळे राज्याचे सुमारे 797.87 कोटी रुपयांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता हवामान विभागाने 11 ऑगस्टपर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे.

या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

शिमला हवामान केंद्राचे संचालक शोभित कटियार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 आणि 11 ऑगस्ट रोजी काही भागांत अत्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. 10 ऑगस्टसाठी कांग्रा, कुल्लू, मंडी आणि सिरमौर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर 11 ऑगस्ट रोजी चंबा, कुल्लू, मंडी आणि सिरमौर या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा आहे. याशिवाय 7 ते 10 ऑगस्ट दरम्यान बिलासपूर, शिमला, सोलन आणि किन्नौर या क्षेत्रांत 'येलो अलर्ट' लागू करण्यात आला आहे. 12 ऑगस्टनंतर पावसाची तीव्रता काहीशी कमी होण्याचा अंदाज आहे.

अपघात, दरड कोसळणे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान

नोंद झालेल्या 142 मृत्यूंपैकी 64 बळी हे नैसर्गिक आपत्तींमुळे गेले आहेत, तर 78 जणांचा मृत्यू रस्ते अपघातात झाला. झाडे किंवा दगड अंगावर पडल्याने सर्वाधिक 21 जणांचा मृत्यू झाला, तर दरडी कोसळून 14 जणांनी जीव गमावला. याशिवाय 2 व्यक्ती अजूनही बेपत्ता असून 194 पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे 22 घरे पूर्णपणे तर 39 घरे अंशतः उद्ध्वस्त झाली आहेत. सोबतच 90 दुकाने आणि 142 गोठ्यांचे नुकसान झाले असून 72.04 हेक्टर शेतजमिनीवरील पिकांना मोठा फटका बसला आहे.

वाहतूक, वीज आणि पाणीपुरवठा ठप्प

लगातार होणाऱ्या पावसामुळे राज्यभरातील 120 रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. यात मंडीतील 38, कुल्लूतील 31 आणि सिरमौरमधील 26 रस्त्यांचा समावेश आहे. एनएच-5 (NH-5) वरील निगुलसारी येथील दरड हटवून तो शुक्रवारी पूर्ववत करण्यात आला. पावसामुळे 39 ट्रान्सफॉर्मर्स बंद पडल्याने अनेक भागांतील वीज खंडित झाली आहे, तर 60 पेयजल योजना बाधित झाल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

हेही वाचा – Cyber Fraud:फेसबुकवरील मैत्री पडली महागात! शेतकऱ्याची 6.31 लाखांची फसवणूक; निघालं आफ्रिकन कनेक्शन

प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

दरडी कोसळण्याचा आणि नद्यांना पूर येण्याचा धोका लक्षात घेता प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना नद्या, ओढे आणि धोकादायक टेकड्यांपासून लांब राहण्याचे आवाहन केले आहे. बाधित रस्ते, वीज आणि पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा कार्यरत आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेश आणि बिहारसह देशातील 15 राज्यांमध्ये मान्सूनमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून तेथेही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number