Heavy Rainfall : देशभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक राज्यांत भीषण आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये 8 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 8 जण अद्याप बेपत्ता आहेत. तसेच या नैसर्गिक आपत्तीत 13 जण जखमी झाले आहेत. केरळ प्रशासनाने तातडीने पावले उचलत राज्यभरात 209 मदत शिबिरांची उभारणी केली असून सुमारे 5,792 आपत्तीग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. दुसरीकडे, कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात दरड घरांवर कोसळल्याने झोपेत असलेल्या एकाच कुटुंबातील 3 जणांचा जागीच अंत झाला. या पावसामुळे केरळमध्ये 27 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून 196 घरांची पडझड झाली आहे.
किश्तवारमध्ये ढगफुटी आणि बद्रीनाथ महामार्ग खचला
उत्तर भारतातही पावसाने तीव्र रौद्ररूप धारण केले आहे. जम्मू-काश्मीरमधील किश्तवार येथे अचानक झालेल्या ढगफुटीमुळे छतरू परिसरात पुराचे पाणी घुसले. यात अनेक दुकाने, घरे पाण्याखाली गेली असून 2 वाहने वाहून गेली आहेत. सुरक्षिततेचा उपाय म्हणून किश्तवार, डोडा आणि रामबन जिल्ह्यांतील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
देशातील विविध भागांत अतिवृष्टीचा इशारा
दुसरीकडे, उत्तराखंडमधील चमोलीजवळ भूस्खलनामुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गाचा तब्बल 20 मीटरचा डांबरी रस्ता खचला असून वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. हवामान खात्याने येत्या 7 ऑगस्टपर्यंत देशातील विविध भागांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
नद्यांना उधाण; सखल भागांत पुराचे पाणी
केरळमधील अलाप्पुझा जिल्ह्यात पंबा आणि अचन्कोविल या प्रमुख नद्यांची पातळी धोक्याच्या रेषेकडे वेगाने वाढत आहे. यामुळे कुट्टनाड आणि अप्पर कुट्टनाड परिसरातील 100 हून अधिक घरांमध्ये पाणी शिरले आहे. या जिल्ह्यात स्थापन केलेल्या 11 मदत छावण्यांमध्ये 169 कुटुंबांतील 580 नागरिकांनी आश्रय घेतला आहे. तसेच जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा भागातही संततधार पावसामुळे स्थानिक नाले फुगले असून, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.