Multibagger Stock: आरोग्यसेवा आणि वैयक्तिक आरोग्य क्षेत्रातील आघाडीची कंपनी 'क्युपिड लिमिटेड'च्या शेअरने बाजारात धुमाकूळ घातला आहे. अवघ्या 5 वर्षांपूर्वी 2.43 रुपयांवर असणाऱ्या या शेअरने 200 रुपयांचा टप्पा ओलांडून इतिहास रचला आहे. सलग दुसऱ्या दिवशी तेजीचे सत्र कायम राखत आज NSE वर हा शेअर 1.76 टक्के च्या वाढीसह 213.70 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच या शेअरने 11 टक्के ची उसळी घेत 226 रुपयांचा आजवरचा सर्वोच्च स्तर गाठला होता. दीर्घ आणि अल्प अशा दोन्ही कालावधीत गुंतवणूकदारांना मालामाल करणाऱ्या या शेअरने गेल्या एका महिन्यात 42 टक्के, तीन महिन्यांत 133 टक्के आणि सहा महिन्यांत 154 टक्के कालावधीत मोठा नफा दिला आहे. तर गेल्या एका वर्षात 874 टक्के आणि 5 वर्षांत तब्बल 8,760 टक्केचा अफाट परतावा देऊन हा खऱ्या अर्थाने 'मल्टीबॅगर' ठरला आहे.
या अभूतपूर्व वाढीमुळे 5 वर्षांपूर्वी 9 जुलै 2021 रोजी क्युपिड शेअरमध्ये 10,000 रुपयांची किरकोळ गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या भांडवलाचे मूल्य आज 8,79,423 रुपये झाले आहे. तसेच, ज्यांनी वर्षभरापूर्वी यात 1 लाख रुपये गुंतवले होते, ते आज 10 लाख रुपयांचे मालक बनले आहेत. पुरुष व महिलांचे कंडोम, वॉटर-बेस्ड ल्युब्रिकंट जेली आणि IVD किट्सचे उत्पादन करणाऱ्या या कंपनीची वार्षिक उत्पादन क्षमता सध्या 480 दशलक्ष पुरुष कंडोम आणि 52 दशलक्ष महिला कंडोम इतकी आहे.
कंपनीच्या मजबूत आर्थिक कामगिरीमुळे या तेजीला बळ मिळाले आहे. मार्च 2026 च्या तिमाहीत कंपनीने 120 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला, जो मागील वर्षाच्या याच तिमाहीतील 56 कोटी रुपयांच्या तुलनेत दुप्पट आहे. हाच वाढता आलेख लक्षात घेऊन कंपनीने 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी (Q1 FY27) आपल्या महसुलाचा अंदाज वाढवला असून तो 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त राहण्याची शक्यता वर्तवली आहे. ही कामगिरी कंपनीच्या इतिहासातील सर्वात मजबूत तिमाही ठरू शकते.
(Disclaimer: या बातमीमध्ये दिलेली माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने देण्यात आली आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असल्याने, कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा.)