Petrol-Diesel Price Hike: इंधन दरवाढीची मालिका सुरूच राहणार? इंडियन ऑइलचा थेट संकेत; महागाईच्या भीतीने ग्राहकांवर टप्प्याटप्प्याने बोजा टाकण्याची रणनीती

मंगळवारी तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात प्रति लिटर सुमारे 90 पैशांची नवी वाढ जाहीर केली. विशेष म्हणजे, अवघ्या 5 दिवसांतील ही दुसरी दरवाढ आहे.

Petrol-Diesel Price Hike: इंधन दरवाढीची मालिका सुरूच राहणार? इंडियन ऑइलचा थेट संकेत; महागाईच्या भीतीने ग्राहकांवर टप्प्याटप्प्याने बोजा टाकण्याची रणनीती

Petrol-Diesel Price Hike: देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी पुन्हा एकदा उचल खाल्ली असून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे. मंगळवारी तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात प्रति लिटर सुमारे 90 पैशांची नवी वाढ जाहीर केली. विशेष म्हणजे, अवघ्या 5 दिवसांतील ही दुसरी दरवाढ असून यामुळे आगामी काळात 2022 सालाप्रमाणेच सलग दरवाढीची मालिका पाहायला मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर देशातील सर्वात मोठी तेल कंपनी 'इंडियन ऑइल'ने (IOCL) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनुसार, जागतिक परिस्थितीमुळे इंधनाचे दर वाढवणे गरजेचे असले, तरी एकूण दरवाढ किती रुपयांपर्यंत करायची, याचा कोणताही अंतिम आकडा अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही.

पाच दिवसांत लागोपाठ दोन धक्के 
यापूर्वी 15 मे रोजी तेल कंपन्यांनी तब्बल 4 वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर पहिल्यांदाच पेट्रोल-डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 3 रुपयांची मोठी वाढ केली होती. त्यानंतर लगेचच 19 मे रोजी ग्राहकांना दुसरा झटका देत दर 90 पैशांनी वाढवण्यात आले. या लागोपाठच्या दरवाढीमुळे देशाची राजधानी दिल्लीमध्ये आता पेट्रोल 98.64 रुपये तर डिझेल 91.58 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत हीच आकडेवारी आणखी वाढली असून मुंबईकरांना आता पेट्रोलसाठी 107.59 रुपये आणि डिझेलसाठी 94.08 रुपये प्रति लिटर मोजावे लागत आहेत.

'एकत्रित बोजा नको म्हणून टप्प्याटप्प्याने वाढ' 
या वाढत्या किमतींबाबत 'इंडियन ऑइल'च्या (IOCL) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली की, ग्राहकांचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी आणि बाजारातील महागाई नियंत्रित ठेवण्यासाठी कंपनी एकदम मोठी दरवाढ न करता टप्प्याटप्प्याने दर वाढवत आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे इंधनाचा उत्पादन खर्च झपाट्याने वाढत असला, तरी कंपनीने दरवाढीचे कोणतेही 'टार्गेट' ठरवलेले नाही. केवळ त्रैमासिक नफ्याचा विचार न करता ग्राहकांना संरक्षण देणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. कंपनी एका निश्चित चक्रावर आधारित किमती ठरवत असून, दरवाढीच्या एकूण मर्यादेचा अंतिम निर्णय सर्वोच्च स्तरावर घेतला जाईल.

कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याचे मुख्य कारण काय?
पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढवण्यामागे संपूर्णपणे आंतरराष्ट्रीय घडामोडी कारणीभूत असल्याचे आयओसीएलने स्पष्ट केले. मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती आणि जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला 'स्ट्रिट ऑफ होर्मुझ' (Strait of Hormuz) हा सागरी मार्ग बंद होण्याची निर्माण झालेली शक्यता, यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल प्रचंड महागले आहे. असे असूनही उन्हाळ्याच्या दिवसांत इंधनाच्या मागणीत कोणतीही घट होणार नाही, उलट ती आणखी मजबूत राहील असा अंदाज कंपन्यांनी वर्तवला आहे.

वर्ष 2022 च्या पॅटर्नशी तुलना करणे घाईचे
यापूर्वी 2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात तेल कंपन्यांनी मार्च आणि एप्रिल दरम्यान सलग 13 दिवस इंधनाचे दर वाढवले होते. त्या काळात 10 वेळा प्रत्येकी 80 पैशांची वाढ करण्यात आली होती आणि इंडियन ऑइलने अवघ्या 15 दिवसांत पेट्रोल-डिझेल तब्बल 10 रुपयांनी महाग केले होते. यंदाही तसाच प्रकार घडणार का, असे विचारले असता अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीची तुलना 2022 मधील घडामोडींशी करणे योग्य ठरणार नाही.

हेही वाचा – Bread Price Hike: महागाईचा आणखी एक झटका! दूधानंतर आता पाव-ब्रेडचे दर वाढले, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार

महागाईचा आलेख वाढण्याचा अर्थतज्ज्ञांचा अंदाज
सुमारे 4 वर्षांनंतर देशांतर्गत इंधनाच्या किमती वाढल्यामुळे बाजारात महागाईचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 'बार्कलेज' या नामांकित संस्थेच्या अंदाजानुसार, सुरुवातीला झालेल्या प्रति लिटर 3 रुपयांच्या दरवाढीमुळे किरकोळ महागाई निर्देशांकावर (CPI) थेट परिणाम होईल. यामुळे मे महिन्यात महागाई 8 बेसिस पॉईंट्सने आणि जून महिन्यात 15 बेसिस पॉईंट्सने वाढू शकते, ज्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number