How To Get 5G Plus Plus: आजकाल फोनवर इंटरनेट वापरताना अनेकदा सिग्नल बारच्या शेजारी '5G++' असं चिन्ह पाहायला मिळतं. हे चिन्ह पाहून अनेक युजर्स संभ्रमात पडतात. काहींना वाटतं की हे थेट 6G तंत्रज्ञान आहे किंवा 5G ची एखादी पुढची मोठी पायरी आहे. परंतु, वास्तविकता तशी नाही. या चिन्हाचा थेट संबंध 'कॅरियर ॲग्रीगेशन' (Carrier Aggregation) या विशेष तंत्रज्ञानाशी आहे. सर्वसाधारणपणे, आपला मोबाईल एका वेळी टॉवरच्या केवळ एकाच फ्रिक्वेन्सी बँडशी (जसे की 700 MHz किंवा 3500 MHz) जोडलेला असतो. मात्र, जेव्हा स्क्रीनवर 5G++ दिसतं, तेव्हा आपला फोन एकाच वेळी अनेक फ्रिक्वेन्सी बँड्सचा वापर करून नेटवर्कशी जोडलेला असतो. पूर्वी 4G च्या काळातही हेच तंत्रज्ञान वापरताना स्क्रीनवर '4G+' असं दिसायचं.
नेमके काय आहे हे 5G++ तंत्रज्ञान?
सोप्या भाषेत सांगायचे तर, 5G++ ही इंटरनेट विश्वातील कोणतीही नवीन पिढी नसून, सध्याच्या 5G नेटवर्कचा स्पीड दुप्पट-तिप्पट वाढवण्याची एक आधुनिक पद्धत आहे. तांत्रिक परिभाषेत यालाच 'कॅरियर ॲग्रीगेशन' म्हणतात. जेव्हा हे तंत्रज्ञान सक्रिय होते, तेव्हा तुमचे डिव्हाइस एकाच वेळी 2 किंवा 3 वेगवेगळ्या 5G फ्रिक्वेन्सी बँड्सशी जोडले जाते. याचा अंदाज आपण एका उदाहरणावरून घेऊ शकतो; डेटा ट्रॅफिकसाठी फक्त 1 मार्ग (लेन) उपलब्ध असण्याऐवजी, अचानक 3 किंवा 4 मार्ग खुले केले जातात. साहजिकच यामुळे डेटा ट्रान्सफरसाठी एक मोठा आणि मोकळा 'हायवे' तयार होतो, ज्याचा थेट फायदा इंटरनेट स्पीड वाढण्यात होतो.
तुमच्या फोनवर 5G++ कसं सुरू करावं?
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, फोनमध्ये 5G++ थेट सुरू करण्यासाठी कोणतीही स्वतंत्र किंवा विशेष सेटिंग दिलेली नसते. तुमच्या भागातील टेलिकॉम ऑपरेटर (सर्व्हिस प्रोव्हायडर) जर ही सेवा पुरवत असतील, तर तुमच्या फोनवर ते आपोआप सक्रिय होते. जर काही उपकरणांवर '5G+' असं दिसत असेल, तरी त्याचा अर्थ फोन कॅरियर ॲग्रीगेशनचाच वापर करत आहे असा होतो. मात्र, हे फीचर्स सुरळीत चालण्यासाठी तुमच्या फोनमधील काही महत्त्वाच्या 5G सेटिंग्ज ऑन असणे आवश्यक आहे, ज्या खालीलप्रमाणे करता येतील:
नेटवर्क मोड सेटिंग: अँड्रॉइड फोनमध्ये Settings > Connections > Mobile Networks > Network Mode मध्ये जाऊन 5G/LTE/3G/2G (Auto Connect) किंवा Prefer 5G चा पर्याय निवडा. आयफोन (iPhone) युजर्सनी Settings > Cellular > Cellular Data Options > Voice & Data मध्ये जाऊन 5G Auto किंवा 5G On सिलेक्ट करावे.
5G Standalone मोड
फोनला 5G नेटवर्क मिळण्यासाठी अँड्रॉइड युजर्सनी Mobile Networks किंवा Developer Options मध्ये जाऊन 5G Standalone (SA) पर्याय चालू करावा. आयफोनवर हा पर्याय Settings > Cellular > Cellular Data Options > Voice & Data च्या अंतर्गत 5G Standalone टॉगल ऑन करून सुरू करता येतो.
डेटा मोड्स: आयफोनवर हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी कायम ठेवण्यासाठी Settings > Cellular > Cellular Data Options > Data Mode मध्ये जाऊन Allow More Data on 5G हा पर्याय निवडावा, ज्यामुळे डेटा वापरावर कोणतेही बंधन राहत नाही.
सामान्य 5G पेक्षा 5G++ खरोखरच सरस आहे का?
बहुतांश वेळा 5G++ हे सामान्य 5G नेटवर्कपेक्षा अत्यंत वेगवान आणि दमदार कामगिरी करते. परंतु, काही प्रसंगात याच्या मर्यादाही समोर येतात. या तंत्रज्ञानात फोन एकाच वेळी 2 किंवा 3 सिग्नल एकत्र हाताळत असतो. अशा वेळी जर 1 सिग्नल मजबूत आणि दुसरा कमकुवत असेल, तर इंटरनेटचा स्पीड वाढण्याऐवजी अचानक कमी होऊ शकतो. तसेच, एकापेक्षा जास्त सिग्नल्सवर सतत प्रक्रिया करावी लागत असल्याने फोन वेगाने गरम होणे आणि बॅटरी लवकर संपणे अशी समस्या जाणवू शकते. याशिवाय, हाय-स्पीड 5G++ बँड्सची नेटवर्क रेंज मर्यादित असते. त्यामुळे तुम्ही फिरतीवर असताना किंवा घराच्या आत असताना फोन वारंवार बँड्स बदलतो, ज्यामुळे नेटवर्कमध्ये चढ-उतार होऊन इंटरनेटचा वेग मंदावू शकतो.