Payroll System: ‘महिन्यातून एकदा नव्हे, तर दोनदा द्या पगार…’; ‘या’ बड्या व्यावसायिकाचे कंपन्यांना जाहीर आवाहन

इंग्रजांच्या काळापासून सुरू असलेल्या जुन्या नियमांनुसार आजही बहुतांश कंपन्यांमध्ये महिना संपल्यानंतर किंवा पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला वेतन दिले जाते.

Payroll System: ‘महिन्यातून एकदा नव्हे, तर दोनदा द्या पगार…’; ‘या’ बड्या व्यावसायिकाचे कंपन्यांना जाहीर आवाहन

Payroll System: 'शादी डॉट कॉम' (Shaadi.com) या आघाडीच्या मॅट्रिमोनी प्लॅटफॉर्मचे सर्वेसर्वा आणि प्रसिद्ध व्यावसायिक अनुपम मित्तल यांनी नोकरदार वर्गाच्या हक्कासाठी कॉर्पोरेट जगतासमोर एक अत्यंत धाडसी आणि नाविन्यपूर्ण प्रस्ताव ठेवला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या पारंपारिक पगार वाटप पद्धतीमध्ये आता आमूलाग्र सुधारणा करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इंग्रजांच्या काळापासून सुरू असलेल्या जुन्या नियमांनुसार आजही बहुतांश कंपन्यांमध्ये महिना संपल्यानंतर किंवा पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला वेतन दिले जाते. ही कालबाह्य पद्धत मोडीत काढून कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना महिन्यातून एकदा नव्हे, तर दोन वेगवेगळ्या टप्प्यांत पगार द्यावा, जेणेकरून नोकरदारांना आर्थिक स्थैर्य लाभेल, अशी आग्रही भूमिका मित्तल यांनी मांडली आहे.

'लिंक्डइन'वर मांडली रोखठोक भूमिका

अनुपम मित्तल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'लिंक्डइन' (LinkedIn) वर एका विशेष पोस्टद्वारे या संवेदनशील विषयाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. आजच्या काळात कंपन्या चांगल्या टॅलेंटला आपल्याकडे खेचण्यासाठी मोफत जेवण, अमर्याद सुट्ट्या किंवा घरून काम करण्याची मुभा (WFH) यांसारखे अनेक दिखाऊ फायदे देतात; मात्र कर्मचाऱ्यांची सर्वात मुख्य गरज असलेल्या वेळेवरच्या पगाराकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. बहुतांश कॉर्पोरेट कंपन्या 7 तारखेच्या आत पगार देण्याचा दावा करतात. मात्र, नेमकी त्याच दरम्यान शनिवार-रविवारची सुट्टी (वीकेंड) आल्यास पगार आणखी रखडतो. व्यवस्थापनाच्या या ढिसाळ नियोजनाचा नाहक मनस्ताप कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

पगारातील विलंबाचा थेट फटका ईएमआय आणि घरभाड्याला

आपल्या स्वतःच्या कंपनीचे उदाहरण देताना मित्तल यांनी सांगितले की, 'शादी डॉट कॉम'ने काही वर्षांपूर्वीच या समस्येवर मात करत आपली पेरोल यंत्रणा अधिक सक्षम केली आहे. त्यानुसार त्यांच्या कर्मचाऱ्यांना पुढील महिन्याची वाट न पाहता चालू महिन्याच्या अखेरच्या दिवशीच पगार दिला जातो. वेळेवर पैसे मिळणे हा कर्मचाऱ्यांचा हक्क असून ही केवळ 'सामान्य बुद्धीची' गोष्ट आहे, असे ते मानतात. पगाराला होणाऱ्या अवघ्या दोन ते तीन दिवसांच्या विलंबाचा नोकरदारांच्या बजेटवर विपरीत परिणाम होतो. यामुळे घराचे भाडे थकणे, बँकेचे ईएमआय (EMI) बाऊन्स होणे आणि विनाकारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागणे यांसारख्या अडचणींना कर्मचाऱ्यांना तोंड द्यावे लागते. याउलट, हातात वेळेत पैसे आल्यास कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते.

हेही वाचा – ED Action on Vedanta Group: शेअर बाजारात मोठी खळबळ! वेदांत समूहावर ED ची धडक, काही तासांत बदललं गुंतवणूकदारांचं गणित

15आणि 30 तारखेचा फॉर्म्युला 

या आर्थिक समस्येवर तोडगा सुचवताना अनुपम मित्तल यांनी 'बाय-वीकली' म्हणजेच 15 आणि 30 अशा दोन तारखांना पगार देण्याचा सुवर्णमध्य सुचवला आहे. आजच्या आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात कंपन्यांसाठी अशी दुहेरी पगार प्रणाली राबवणे अजिबात कठीण नाही. महिन्याच्या मधोमध आणि शेवटी पैसे मिळाल्यास कर्मचाऱ्यांवरील कर्जाचा ताण हलका होईल आणि त्यांची बाजारपेठेतील खरेदी क्षमता देखील वाढेल. कंपन्यांनी हा क्रांतिकारी निर्णय घेतल्यास कर्मचाऱ्यांचे जीवनमान तर सुधारेलच, शिवाय बाजारात पैशांची आवक वाढून देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठी गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number