Gold Silver Price Today: काही दिवसांपासून सातत्याने नवनवे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या मौल्यवान धातूंच्या किमतींना अखेर चाप बसला आहे. आजच्या व्यापारी सत्रात दोन्ही धातूंच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) व्यवहार सुरू होताच चांदीच्या भावात तब्बल 5,600 रुपयांपेक्षा अधिकची तीव्र घसरण झाली, तर सोन्याचे भावही 1,300 रुपयांपेक्षा जास्त कोसळले. या दरवाढीच्या तडाख्यातून सुटल्यामुळे ग्राहक आणि बाजारपेठेतील गुंतवणूकदारांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
चांदीच्या दरात मोठी घसरण
'MCX' वर 3 जुलै रोजीच्या डिलिव्हरीसाठीची चांदी मागील सत्रात 2,64,796 रुपये प्रति किलो या पातळीवर थांबली होती. मात्र, आजच्या बाजाराची सुरुवातच घसरणीसह 2,60,024 रुपयांवर झाली. त्यानंतर सुरुवातीच्या सत्रातच चांदी 5,629 ने घसरून थेट 2,59,167 रुपयांच्या पातळीवर आली. सकाळी 10.15 च्या सुमारास ही घसरण काहीशी सावरत चांदी 4,260 च्या तुटीसह 2,60,536 रुपयांवर व्यवहार करत होती. किरकोळ सराफा बाजाराचा विचार केल्यास, तेथे चांदी प्रति किलो 5,000 ने स्वस्त होऊन 2,75,000 वर पोहोचली आहे.
सोन्याचे भावही खालावले
चांदीच्या पावलावर पाऊल ठेवत सोन्याच्या दरातही मोठी घट पाहायला मिळाली. 5 ऑगस्टच्या डिलिव्हरीचे सोने मागील सत्रात 1,59,547 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते, जे आज थेट 1,58,598 वर खुले झाले. सकाळच्या सत्रात सोन्याचे भाव 1,334 ने उतरून 1,58,213 रुपयांवर आले.
'गुड रिटर्न्स'च्या आकडेवारीनुसार, सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचे दर 380 रुपयाने घसरून 1,42,730 प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. तसेच 24 कॅरेट सोन्यात 350 रुपयांची घट होऊन ते 1,55,730 रुपयांवर आणि 18 कॅरेट सोने 280 रुपयांनी स्वस्त होऊन 1,16,800 रुपयांवर आले आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने ग्राहकांसाठी ही खरेदीची उत्तम संधी मानली जात आहे.