LPG Cylinder Subsidy: घरगुती एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी केंद्र सरकारने आता नियमावली अधिक कडक केली आहे. 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधील संकटामुळे निर्माण झालेली जागतिक परिस्थिती आणि आर्थिक वास्तव लक्षात घेऊन, सरकारने आता केवळ खऱ्या गरजू कुटुंबांनाच गॅस अनुदानाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, ज्या ग्राहकांचे वार्षिक उत्पन्न जास्त आहे, त्यांना सरकारकडून एसएमएस (SMS) द्वारे अलर्ट्स पाठवण्यात येत असून त्यांच्या पात्रतेची पडताळणी सुरू करण्यात आली आहे.
7 दिवसांत प्रतिसाद देणे अनिवार्य; अन्यथा अनुदान कायमचे बंद
सरकारने पाठवलेल्या संदेशांनुसार, ज्या व्यक्तींचे वार्षिक करपात्र उत्पन्न 10 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. अशा ग्राहकांनी 7 दिवसांच्या आत आपल्या उत्पन्नाबाबत योग्य तो प्रतिसाद देणे किंवा माहिती सादर करणे आवश्यक आहे. जर विहित मुदतीत समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही, तर संबंधित ग्राहकाचे एलपीजी अनुदान तातडीने आणि कायमचे बंद केले जाणार आहे.
PAN आणि आधार कार्डाद्वारे होणार तांत्रिक पडताळणी
अनुदानाचा हा लाभ केवळ गरिबांपर्यंत पोहोचावा यासाठी सरकार आता तंत्रज्ञानाचा मोठा वापर करत आहे. ग्राहकांच्या पॅन कार्डशी (PAN) जोडलेल्या कर नोंदी आणि आधार कार्डशी (Aadhaar) जोडलेली कौटुंबिक माहिती यांची एलपीजी डेटाबेससोबत 'क्रॉस-व्हेरिफिकेशन' केली जात आहे. विशेष म्हणजे, केवळ गॅस जोडणी धारकाचेच नव्हे, तर कुटुंबातील इतर सदस्यांचे उत्पन्नही या पडताळणीच्या कक्षेत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
काय करावे लागेल? ग्राहकांसाठी महत्त्वाच्या सूचना
ज्या ग्राहकांना अशा प्रकारचे संदेश किंवा सूचना प्राप्त झाल्या आहेत, त्यांनी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. आपली 'केवायसी' (KYC) कागदपत्रे आणि उत्पन्नाशी संबंधित नोंदींची पडताळणी करण्यासाठी ग्राहकांनी आपल्या नोंदणीकृत एलपीजी वितरकाकडे (Distributor) संपर्क साधावा. याशिवाय, तेल विपणन कंपन्यांच्या (OMCs) अधिकृत पोर्टलवर जाऊनही ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. पात्र नसलेल्या व्यक्तींना अनुदानाच्या प्रवाहातून बाहेर काढून सरकारी तिजोरीवरील बोजा कमी करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.