Maratha Reservation : महायुती सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. मराठा समाजातील तरुण पिढीला आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचे धोरणात्मक पाऊल उचलले आहे. इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सर्व शैक्षणिक सोयी-सुविधा आणि सवलती आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या ऐतिहासिक निर्णयांतर्गत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी एकूण 8 विशेष योजनांची घोषणा करण्यात आली असून, यामुळे उच्च आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या हजारो गरजू विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.
मराठा विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणाऱ्या 8 विशेष योजना:
10 वी नंतरची शिष्यवृत्ती: दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील उच्च शिक्षणाचा खर्च पेलता यावा यासाठी ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणेच आता मराठा विद्यार्थ्यांनाही ‘शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती’ दिली जाईल.
रोजगारभिमुख चालक-वाहक प्रशिक्षण: मराठा समाजातील तरुणांना हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी विशेष मोटार वाहन चालक आणि वाहक प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे.
9 वी ते 12 वी विशेष शिष्यवृत्ती: इयत्ता नववी ते बारावी या माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर शिकणाऱ्या मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना विस्तारित करण्यात आली आहे.
थेट शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती: शैक्षणिक शुल्काशी संबंधित इतर 16 वेगवेगळ्या बाबींची फी प्रतिपूर्ती (Reimbursement) थेट शासनामार्फत केली जाणार आहे.
परराज्यातील शिक्षणासाठी सवलत: महाराष्ट्राचे रहिवासी असलेले परंतु परराज्यात अनुदानित किंवा विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांना (Professional Courses) प्रवेश घेतलेले मराठा विद्यार्थीही या सवलतींसाठी पात्र ठरतील.
सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश: ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सवलतींच्या धर्तीवर, सर्व शासनमान्य व्यावसायिक कोर्सेससाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सरसकट पात्र धरले जाईल.
रिक्त जागांवर प्रवेश घेणाऱ्यांनाही दिलासा: केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (CAP) संपल्यानंतर महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या जागांवर किंवा संस्थास्तरावर (Institutional Level) प्रवेश नियंत्रण समितीच्या मान्यतेने प्रवेश घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांनाही सर्व सवलती लागू राहतील.
हेही वाचा – महाविकास आघाडीत उभी फूट? शरद पवार गटाकडून विश्वासघात झाल्याचा ठाकरे सेनेच्या बड्या नेत्याचा गंभीर आरोप
‘या’ एका तरतुदीमुळे मराठा विद्यार्थ्यांना मोठा फायदा
दरम्यान, या सरकारी निर्णयामध्ये सर्वात महत्त्वाची आणि दूरगामी तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार, भविष्यात इतर मागास प्रवर्गासाठी (OBC) शासनाकडून ज्या ज्या नवीन शैक्षणिक सवलती किंवा योजना जाहीर केल्या जातील, त्या सर्व योजना कोणत्याही नवीन स्वतंत्र आदेशाची वाट न पाहता मराठा समाजाला देखील थेट आणि आपोआप लागू केल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या दारात पैशांची कमतरता भासणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.