Heart Attack on Badminton Court: मृत्यू कधी आणि कोणत्या रूपाने समोर येईल याचा नेम नाही. छत्तीसगडची राजधानी रायपूरमधून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. डीडी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अश्विनी नगर येथील सोनकर बारी मैदानावर बॅडमिंटन खेळत असताना 57 वर्षीय व्यापारी अमृत बजाज यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. विशेष म्हणजे, या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा लाईव्ह व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शटलकॉक उचलण्यासाठी वाकले अन् प्राण ज्योत मालवली
मिळालेल्या माहितीनुसार, अमृत बजाज हे नेहमीप्रमाणे मैदानावर बॅडमिंटन खेळत होते. खेळ रंगात आलेला असताना त्यांनी एक शॉट मारला आणि शटलकॉक खाली पडला. तो शटलकॉक उचलण्यासाठी ते खाली वाकले, मात्र त्याच क्षणी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते जमिनीवर कोसळले. मैदानातील इतर खेळाडूंनी तातडीने त्यांच्याकडे धाव घेतली, मात्र काही क्षणातच त्यांची प्राणज्योत मालवली.
शिस्तबद्ध जीवनशैली असूनही काळाचा घाला
अमृत बजाज हे आपल्या आरोग्याबाबत अत्यंत जागरूक होते. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड-19 महामारीनंतर त्यांनी व्यायामाला अधिक महत्त्व दिले होते. ते नियमित बॅडमिंटन खेळायचे आणि कोणत्याही व्यसनापासून दूर होते. त्यांना मधुमेह (Diabetes) असला तरी ते अतिशय शिस्तबद्ध जीवन जगत होते. तंदुरुस्त असूनही अशा प्रकारे अचानक झालेल्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मैदानावरील मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ
रायपूरमधील खुल्या बॅडमिंटन कोर्टवर झालेली ही पहिलीच मोठी घटना नाही. यापूर्वी मे 2025 मध्ये सप्रे बॅडमिंटन कोर्टवर एका 35 वर्षीय तरुणाचा खेळताना असाच अचानक मृत्यू झाला होता. वाढत्या वयानुसार आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अशा घटनांचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
रायपुर में बैडमिंटन खेलते खेलते एक कारोबारी को हार्टअटैक आया और मौत हो गई. हर दिन कहीं न कहीं से ऐसे डरावने मामले आ रहे हैं. #Raipur pic.twitter.com/i9bPnaQDtn — Hemraj Singh Chauhan (@JournoHemraj) February 18, 2026
तज्ज्ञांचा सल्ला; लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
हृदयरोगतज्ज्ञांच्या मते, व्यायाम किंवा खेळ खेळताना शरीराची क्षमता ओळखून हालचाल करणे आवश्यक आहे. 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी हृदयाची विशेष काळजी घेतली पाहिजे. खेळताना छातीत अचानक दुखणे किंवा जडपणा जाणवणे, गरजेपेक्षा जास्त घाम येणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा चक्कर येणे, हृदयाचे ठोके असामान्य होणे ही लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. तथापी, अशा परिस्थितीत तातडीने सीपीआर (CPR) दिल्यास रुग्णाचे प्राण वाचण्याची शक्यता असते.