Nitish Kumar Resignation: बिहारमध्ये सत्तांतराचे वारे, नितीश कुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; आता दिल्लीच्या राजकारणात एन्ट्री

गेल्या दोन दशकांपासून बिहारचे नेतृत्व करणारे नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. आता ते राज्याच्या राजकारणातून दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होण्याच्या तयारीत आहेत.

Nitish Kumar Resignation: बिहारमध्ये सत्तांतराचे वारे, नितीश कुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; आता दिल्लीच्या राजकारणात एन्ट्री

Nitish Kumar Resignation: बिहारच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी आणि अनपेक्षित घडामोड घडली आहे. गेल्या दोन दशकांपासून बिहारचे नेतृत्व करणारे नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. आता ते राज्याच्या राजकारणातून दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होण्याच्या तयारीत असून, आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निर्णयामुळे बिहारसह देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. जेडीयू नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, हा पक्ष नितीश कुमारांचा आहे आणि त्यांच्या प्रत्येक निर्णयाशी पक्ष ठामपणे उभा आहे.

नितीश कुमार यांनी ट्विटद्वारे दिली माहिती
स्वतः मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आपल्या निर्णयाची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी बिहारच्या जनतेचे आभार मानताना लिहिले की, “दोन दशकांहून अधिक काळ तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला, त्या बळावर आम्ही बिहारची निष्ठेने सेवा केली. आज बिहार विकासाच्या ज्या टप्प्यावर आहे, त्याचे सर्व श्रेय तुमच्या पाठिंब्याला जाते.”

मनातील इच्छा बोलून दाखवली
आपल्या संसदीय कारकिर्दीबद्दल भाष्य करताना नितीश कुमार म्हणाले, “माझी सुरुवातीपासूनच एक इच्छा होती की, मी बिहार विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचा आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांचा (लोकसभा व राज्यसभा) सदस्य असावे. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आता राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. जरी मी दिल्लीला जात असलो, तरी बिहारच्या विकासासाठी माझा संकल्प अढळ राहील आणि नवीन सरकारला माझे पूर्ण मार्गदर्शन लाभेल.”

पुढच्या पिढीकडे सत्ता सोपवण्याची तयारी
दरम्यान, 2005 पासून बिहारचे राजकारण नितीश कुमार यांच्याभोवती फिरत आहे. मात्र, अलीकडच्या काळात त्यांच्या प्रकृतीबाबत चर्चा सुरू होत्या. 2025 च्या निवडणुकीनंतर त्यांनी पहिल्यांदाच आपल्याकडील अत्यंत महत्त्वाचे असलेले गृहखाते सोडून बदलाचे संकेत दिले होते. आता ते बिहारची सूत्रे अधिकृतपणे पुढच्या पिढीकडे सोपवण्याच्या तयारीत आहेत. राज्याच्या राजकारणातील एका मोठ्या युगाचा हा अंत मानला जात आहे.

हेही वाचा – Rajya Sabha Elections: महाराष्ट्रातील राज्यसभा रणसंग्राम रंगात; भाजपकडून चार उमेदवार जाहीर, नव्या चेहऱ्यांना संधी देत दिग्गजांचा पत्ता कट

नव्या मुख्यमंत्र्यांचा शोध आणि निशांत कुमार यांची एन्ट्री?
नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर आता बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण, यावर खलबते सुरू झाली आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे, नितीश कुमार यांचे चिरंजीव निशांत कुमार सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता असून, त्यांना बिहार विधान परिषदेवर पाठवून उपमुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number