Morena Railway Accident: मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. खजुराहो-उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेस (गाडी क्रमांक 19665) मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये ट्रेनला आग लागल्याची एक खोटी अफवा पसरली. या अफवेमुळे घाबरलेल्या प्रवाशांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावत्या ट्रेनमधून थेट रेल्वे रुळावर उड्या मारल्या. नेमक्या याच वेळी मुख्य रुळावरून वेगाने येणाऱ्या पातालकोट एक्सप्रेसने रुळावर उतरलेल्या प्रवाशांना जोरदार धडक दिली. मुरैना येथील हेतमपूर रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या या भीषण अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
चेन ओढून ट्रेन थांबवली आणि घात झाला
उत्तर मध्य रेल्वेच्या झाशी विभागांतर्गत येणाऱ्या हेतमपूर (HET) ते धोलपूर (DHO) या रेल्वे मार्गावर ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, ट्रेनच्या जनरल डब्यातील एका प्रवाशाने अचानक अलार्म चेन (ACP) ओढल्यामुळे गाडी मुख्य मार्गावरच थांबली होती. ट्रेन थांबताच डब्यात लागलेल्या आगीच्या भीतीने काही प्रवाशांनी तातडीने खाली उतरून शेजारचा रेल्वे ट्रॅक गाठला, जो त्यांच्यासाठी मृत्यूचा सापळा ठरला.
विरुद्ध दिशेने येणाऱ्या पातालकोट एक्सप्रेसने चिरडले
प्रवासी शेजारच्या रुळावर उभे असतानाच, समोरच्या बाजूने फिरोजपूर-सिवनी पातालकोट एक्सप्रेस (गाडी क्रमांक 20424) वेगाने आली. रुळावर माणसे असल्याचे लक्षात येण्यापूर्वीच या ट्रेनची धडक अनेक प्रवाशांना बसली. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य सुरू केले.
रेल्वे प्रशासनाचे अधिकृत स्पष्टीकरण
या भीषण अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने आपली बाजू मांडत एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, धोलपूरजवळ काही प्रवाशांनी विनाकारण चेन ओढून ट्रेन थांबवली होती आणि त्यानंतर ते खाली उतरले होते. अनधिकृत आणि असुरक्षित ठिकाणी रेल्वे रुळ ओलांडत असतानाच, दुसऱ्या ट्रॅकवरून जाणाऱ्या ट्रेनच्या धडकेत 4 प्रवाशांचा मृत्यू झाला. रेल्वेने स्पष्ट केले आहे की, हा अपघात रेल्वेच्या कोणत्याही तांत्रिक चुकीमुळे किंवा त्रुटीमुळे झालेला नसून, आगीच्या अफवेमुळे प्रवाशांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे आणि असुरक्षितपणे रुळ ओलांडल्यामुळे घडला आहे.