BrahMos Missile: भारताच्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची मागणी जगभरात प्रचंड वाढली असून, लवकरच तब्बल 41 अब्ज रुपयांचा (450 दशलक्ष डॉलर) निर्यात करार होण्याची शक्यता आहे. संरक्षण निर्यातीच्या क्षेत्रात भारताच्या वाढत्या सामर्थ्याला हा करार नवे बळ देणार आहे.
ब्रह्मोससाठी खरेदीदारांची लांब रांग
डीआरडीओ आणि रशियाच्या संयुक्त सहयोगातून विकसित झालेले ब्रह्मोस क्षेपणास्त्र, त्याच्या अचूकता आणि वेगामुळे जगभरात ओळख मिळवत आहे. अलीकडेच ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानी तळांवर झालेल्या अचूक आणि विनाशकारी हल्ल्यांनंतर या क्षेपणास्त्राची मागणी प्रचंड वाढली आहे. एएनआयच्या माहितीनुसार, भारत लवकरच 41 अब्ज किमतीचा निर्यात करार अंतिम करणार असून यामुळे भारताची संरक्षण निर्यात नवी उंची गाठेल.
मैत्रीपूर्ण देशांसह इतर राष्ट्रांकडूनही वाढता रस
दुबई एअर शोमध्ये ब्रह्मोसचे प्रदर्शन झाल्यानंतर अनेक देशांनी रस दाखवला. संरक्षण अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मैत्रीपूर्ण देशांव्यतिरिक्त अनेक इतर राष्ट्रांनाही ब्रह्मोस खरेदी करण्यात मोठी रुची दाखवली आहे. भारतातील संरक्षण उद्योगाने गेल्या काही वर्षांमध्ये मोठी झेप घेतली आहे. काही वर्षांपूर्वी 1,000 कोटींच्या आसपास असलेली संरक्षण निर्यात, आता 25,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. 2029 पर्यंत हे लक्ष्य 50,000 कोटींवर नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज भारत 100 पेक्षा जास्त देशांना संरक्षण साहित्य पुरवतो.
हेही वाचा – Delhi Blast Update: दिल्ली बॉम्बस्फोटप्रकरणी NIA ची कारवाई; दहशदवादी उमरला मदत करणारा शोएब अटकेत
ब्रह्मोसचे संभाव्य खरेदीदार कोण?
फिलीपिन्सने 2022 मध्ये ब्रह्मोस खरेदी करून सुरुवात निर्यातीला सुरुवात केली. सध्या किमान 16 देश रांगेत आहेत, ज्यामध्ये व्हिएतनाम आघाडीवर आहे. मलेशिया, थायलंड, सिंगापूर, ब्राझील, ब्रुनेई, चिली, अर्जेंटिना, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कतार आणि इजिप्त हे देखील संभाव्य खरेदीदार असल्याचे सांगण्यात येत आहे.
ऑपरेशन सिंदूरमधील यशामुळे वाढली मागणी
दरम्यान, ऑपरेशन सिंदूर दरम्यान ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या प्रचंड यशानंतर, संरक्षण मंत्रालयाने सुरुवातीला नौदल, हवाई दल आणि लष्करासाठी मोठ्या खरेदीला मान्यता दिली. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, ब्राह्मोस क्षेपणास्त्रांनी प्रथम पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा सारख्या दहशतवादी संघटनांचे लक्ष्य नष्ट केले. दुसऱ्या टप्प्यात, ब्राह्मोसने पाकिस्तानी हवाई तळांवर अचूक हल्ला केला आणि त्यांना पूर्णपणे निष्क्रिय केले. तेव्हापासून, ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदीदारांमध्ये रस वाढू लागला आहे.