NEET Paper Leak Case: देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET UG 2026 पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या प्रकरणात पुण्यातील मॉडर्न कॉलेजच्या ज्येष्ठ प्राध्यापिका मनीषा गुरुनाथ मांढरे यांना अटक केली असून, दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने त्यांना 14 दिवसांच्या CBI कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, मांढरे या आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर अवघ्या 7 महिन्यांत निवृत्त होणार होत्या, मात्र त्यापूर्वीच या मोठ्या घोटाळ्यात त्यांचे नाव समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
न्यायालयीन प्रक्रिया आणि CBI चा युक्तिवाद
न्यायालयातील सुनावणीदरम्यान, CBI ने मांढरे यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्यासाठी 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. तपास यंत्रणेच्या वतीने सांगण्यात आले की, या कटाचे धागेदोरे शोधण्यासाठी आणि सहभागी असलेल्या इतर आरोपींची ओळख पटवण्यासाठी त्यांची कोठडी आवश्यक आहे. दुसरीकडे, बचाव पक्षाच्या वकिलांनी या मागणीला तीव्र विरोध दर्शवला. इतक्या प्रदीर्घ कालावधीची कोठडी देण्याबाबत त्यांनी आक्षेप नोंदवला, मात्र गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाने CBI ची मागणी मान्य केली.
NTA तज्ज्ञ म्हणून असलेल्या अधिकाराचा गैरवापर?
तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा मांढरे या केवळ एक प्राध्यापिका नसून 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी'शी (NTA) संबंधित तज्ज्ञ म्हणून कार्यरत होत्या. त्यांना वनस्पतीशास्त्र (Botany) आणि प्राणीशास्त्र (Zoology) या विषयांच्या प्रश्नपत्रिकांपर्यंत थेट पोहोच उपलब्ध होता. या अधिकाराचा वापर करून त्यांनी पेपरफुटीच्या कटात मदत केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथील नामांकित 'मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स'मध्ये त्या कार्यरत असल्याने त्यांच्या अटकेने शैक्षणिक वर्तुळात धक्का बसला आहे.
हेही वाचा – Kalyan Crime: घरातच दिले जात होते घरफोडीचे धडे; जन्मदात्या बापानेच मुलांना बनवलं चोर, नेमकं प्रकरण काय?
तपासाचा घेरा अधिक व्यापक
NEET पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत विविध शहरांतून एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. या मोठ्या रॅकेटमध्ये अनेक राज्यांतील लोकांचा सहभाग असल्याचे समोर आले असून, CBI सध्या अनेक संशयितांची चौकशी करत आहे. मनीषा मांढरे यांच्या कोठडी दरम्यान होणाऱ्या चौकशीतून या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कटात आणखी काही बडे मासे अडकतात का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.