Terror Module Exposed: दिल्ली पोलिसांच्या 'स्पेशल सेल'ला (विशेष पथक) दहशतवादविरोधी मोहिमेत मोठे यश आले आहे. लष्कर-ए-तैयबाचा सक्रिय दहशतवादी शब्बीर अहमद लोन याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शब्बीर हा अलीकडेच गाजलेल्या 'मेट्रो पोस्टर प्रकरणा'मागील मुख्य सूत्रधार (हँडलर) असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तो या संपूर्ण दहशतवादी मॉड्यूलचे संचालन करत होता आणि अटकेत असलेल्या इतर आरोपींच्या थेट संपर्कात होता. सध्या सुरक्षा यंत्रणा या कटाची पाळेमुळे खोदण्यासाठी त्याची कसून चौकशी करत आहेत.
ISI चे पाठबळ आणि बांगलादेश कनेक्शन
प्राथमिक तपासातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI च्या थेट इशाऱ्यावर शब्बीर भारतात लष्कर-ए-तैयबाचा एक नवीन गट (मॉड्यूल) तयार करण्याच्या प्रयत्नात होता. तो बांगलादेशात बसून आपली सूत्रे हलवत होता आणि तेथूनच भारतात घातपाती कारवाया करण्याचे कट रचले जात होते. एका विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे दिल्ली सीमेजवळ सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.
दिल्ली ते कोलकाता: भारताविरोधी पोस्टर्सचा धुमाकूळ
या दहशतवादी मॉड्यूलने देशाची राजधानी दिल्लीपासून थेट कोलकातापर्यंत अनेक शहरांमध्ये भारताविरोधी पोस्टर्स लावून खळबळ उडवून दिली होती. या पोस्टर्सवर ठार झालेला दहशतवादी बुरहान वानी याचे उदात्तीकरण करण्यात आले होते. तसेच, 'काश्मीर मुक्त करा' आणि 'भारतातील नरसंहार थांबवा' अशा प्रक्षोभक घोषणाही त्यावर छापण्यात आल्या होत्या. 8 फेब्रुवारी रोजी जनपथ मेट्रो स्टेशनवर अशा प्रकारचे पोस्टर्स दिसल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला होता.
8 बांगलादेशी आधीच ताब्यात
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून दिल्ली पोलिसांनी हा तपास आपल्या 'स्पेशल सेल'कडे सोपवला होता. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यापैकी बहुतांश आरोपी हे बांगलादेशी नागरिक आहेत. हे सर्वजण बनावट ओळखपत्रांच्या आधारे बेकायदेशीरपणे भारतात घुसले होते. शब्बीर अहमद लोनच्या अटकेमुळे आता या जाळ्यातील इतर मोठ्या माशांपर्यंत पोहोचणे पोलिसांना सुलभ होणार आहे.