Semicon 2.0: मोबाईल फोनपासून ते अत्याधुनिक लढाऊ विमानांपर्यंतच्या डिजिटल उपकरणांचे 'मेंदू' मानल्या जाणाऱ्या सेमीकंडक्टर चिप्सच्या निर्मितीमध्ये भारत आता स्वावलंबी होणार आहे. केंद्र सरकारने देशांतर्गत चिप डिझाईन आणि उत्पादनाला गती देण्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा 'सेमिकॉन 2.0' (Semicon 2.0) योजनेला हिरवा कंदील दाखवला आहे. या ऐतिहासिक योजनेसाठी तब्बल 1,27,500 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रगत चिप्ससाठी भारत चीन, तैवान आणि अमेरिका यांसारख्या देशांवर अवलंबून होता; मात्र आता देशातील इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल्स, दूरसंचार, संरक्षण, अंतराळ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांसारख्या अतिसंवेदनशील क्षेत्रांसाठी लागणाऱ्या चिप्स पूर्णपणे 'मेड इन इंडिया' असतील.
या योजनेचा मुख्य रोख देशातच चिप्सचे डिझाईन करणे आणि त्याचे पेटंट मिळवणे यावर असणार आहे. देशातील जवळपास 105 स्टार्टअप्स आधीच या तंत्रज्ञानावर काम करत असून, त्यांना सरकारकडून थेट प्रोत्साहन दिले जाईल. चिप उत्पादनासाठी केवळ कारखाने उभारणे पुरेसे नसून त्यासाठी लागणारी रसायने, वायू आणि अत्यंत विशिष्ट यंत्रसामग्रीची गरज असते.
या पार्श्वभूमीवर, जे उद्योग भारतातच अशा कच्च्या मालाची निर्मिती करतील, त्यांना 'सेमिकॉन 2.0' अंतर्गत आर्थिक सवलती दिल्या जाणार आहेत. भारताचा पहिला अत्याधुनिक सेमीकंडक्टर कारखाना (फॅब) 2028 पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा असून, विविध प्रकारच्या सिलिकॉन आणि डिस्प्ले फॅब्ससह प्रगत पॅकेजिंग व टेस्टिंग (ATMP/OSAT) तंत्रज्ञान देशात आणण्यासाठी कंपन्यांना सहकार्य केले जात आहे.
राष्ट्रीय सुरक्षेला बळ आणि लाखो हातांना काम
या महाकाय प्रकल्पाच्या माध्यमातून भारतात रोजगाराची अभूतपूर्व क्रांती होणार आहे. 1.27 लाख कोटी रुपयांच्या या अवाढव्य गुंतवणुकीमुळे देशभरात उभारल्या जाणाऱ्या नव्या कारखान्यांमध्ये अभियांत्रिकी, मशिन ऑपरेशन्स, लॉजिस्टिक्स आणि विपणन क्षेत्रात लाखो तरुणांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. यासाठी देशातील 315 विद्यापीठांमधील सुमारे 68,000 विद्यार्थ्यांना आधीच चिप डिझाईनचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून, आगामी काळात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना थेट फॅब आणि क्लीन रूम्समधील कामाचा प्रत्यक्ष अनुभव दिला जाईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, क्षेपणास्त्रे, रडार आणि लढाऊ विमानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या परदेशी चिप्समधील हॅकिंग व डेटा चोरीचा धोका कायमचा संपणार असून, मायदेशात तयार होणाऱ्या चिप्समुळे भारताची लष्करी सज्जता आणि राष्ट्रीय सुरक्षा अधिक अभेद्य होणार आहे.