India Canada Uranium Deal: कॅनडा लवकरच भारताला तब्बल 23,000 कोटींच्या युरेनियमचा मोठा पुरवठा करणार असून, दोन्ही देशांमधील हा ऐतिहासिक करार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सुमारे 10 वर्षांसाठी लागणारा युरेनियम पुरवठा कॅनडामधील सास्काचेवान येथील कॅमेको इंक कंपनीकडून करण्यात येणार आहे. हा महत्त्वपूर्ण करार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या जोहान्सबर्गमध्ये झालेल्या G20 शिखर परिषदेतल्या बैठकीत पुढे नेण्यात आला. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांनी नागरी अणुऊर्जा सहकार्य वाढवण्यास एकमत दर्शवले असून दीर्घकालीन युरेनियम पुरवठ्यासाठी चर्चांना गती मिळाली आहे.
2015 चा करार संपला
कॅमेको आणि भारताच्या अणुऊर्जा विभागामधील पूर्वीचा करार 2015-2020 या काळात लागू होता. त्या आधी 2013 मध्ये भारत-कॅनडा अणु सहकार्य करार लागू झाला होता, ज्यामुळे भारताला कॅनडाकडून वीज निर्मितीसाठी युरेनियम खरेदी करता आला. आता भारत स्मॉल मॉड्यूलर रिअॅक्टर (SMR) या अत्याधुनिक तंत्रज्ञानातही रस दाखवत आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये आणखी मोठी अणु भागीदारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा – Micro Drones: डोळ्यांना न दिसणारे ‘मायक्रो ड्रोन्स’! अमेरिका-चीनमध्ये नवा शस्त्रसंघर्ष
ACITI भागीदारीचा नवा अध्याय
युरेनियम कराराच्या चर्चेचा संबंध अलीकडेच जाहीर झालेल्या ऑस्ट्रेलिया-कॅनडा-भारत टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन (ACITI) भागीदारीशी देखील आहे. मोदी, कार्नी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या बैठकीनंतर ही त्रिपक्षीय भागीदारी जाहीर करण्यात आली. या भागीदारीचे मुख्य उद्दिष्ट स्वच्छ ऊर्जा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, पुरवठा साखळी मजबुती, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विकास करणे हे आहे.
भारत-कॅनडा व्यापारातील वाढती शक्यता
दरम्यान, 2024 मध्ये भारत आणि कॅनडाचे द्विपक्षीय व्यापार मूल्य 22.6 अब्ज डॉलर इतके होते. कॅनडा हा व्यापार 2030 पर्यंत 70 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचा प्रबळ मानस ठेवत आहे. युरेनियम पुरवठा करार आणि ACITI भागीदारीमुळे दोन्ही देशांमधील आर्थिक, तांत्रिक आणि अणुऊर्जा सहकार्य आणखी मजबूत होण्याची अपेक्षा आहे.