Dairy Industry Crisis: देशात सध्या जाणवणाऱ्या एलपीजी (LPG) गॅसच्या तीव्र तुटवड्यामुळे आता सर्वसामान्यांच्या रोजच्या आहारातील महत्त्वाचा घटक असलेल्या दुधावरही संकट ओढवले आहे. दूध गरम करणे, पाश्चरीकरण (Pasteurization) आणि पॅकेजिंग यांसारख्या प्रक्रिया पूर्णतः इंधनावर अवलंबून असल्याने डेअरी उद्योगाची चक्रे अडखळू लागली आहेत. विशेषतः लहान आणि मध्यम आकाराच्या दूध व्यावसायिकांना या परिस्थितीचा मोठा फटका बसत असून, इंधनाअभावी प्रक्रिया थांबवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
पॅकेजिंग साहित्याचा साठा संपण्याच्या मार्गावर
संकट केवळ इंधनापुरते मर्यादित नसून, दुधाच्या पिशव्या आणि कार्टन्स बनवणाऱ्या कारखान्यांनाही गॅसचा पुरवठा होत नसल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. गोवर्धन डेअरीचे संस्थापक देवेंद्र शाह यांनी व्यक्त केलेल्या चिंतेनुसार, पॅकेजिंग मटेरियलचा साठा आता केवळ 10 दिवस पुरेल इतकाच शिल्लक आहे. पिशव्या तयार करणाऱ्या कंपन्यांना गॅस मिळत नसल्याने पुरवठा साखळी पूर्णतः विस्कळीत झाली आहे. जर हा तुटवडा कायम राहिला, तर नजीकच्या काळात बाजारात पिशवीतील दूध मिळणे कठीण होऊ शकते.
मागणीत घट आणि वाढता आर्थिक बोजा
एकडे उत्पादनात तांत्रिक अडचणी येत असताना, दुसरीकडे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सकडून होणारी मागणी मंदावली आहे. बॉम्बे मिल्क प्रोड्यूसर्स असोसिएशनचे अध्यक्ष सी.के. सिंग यांच्या मते, मोठ्या ऑर्डर्स रद्द झाल्यामुळे दुधाचा साठा पडून आहे. साठवणुकीची पुरेशी क्षमता नसल्यामुळे लहान डेअरींना आपले उत्पादन कमी किमतीत विकावे लागत आहे. त्यातच वाहतूक खर्च आणि मजुरी वाढल्याने दूध उत्पादकांना दुहेरी आर्थिक फटका सोसावा लागत आहे.
सणासुदीच्या तोंडावर मिठाई व्यवसायावर सावट
पुढच्या काही दिवसांत गुढीपाडवा हा सण येत असल्याने बासुंदी, श्रीखंड आणि इतर दुग्धजन्य पदार्थांना मोठी मागणी असते. मात्र, गॅसअभावी हे पदार्थ तयार करणे मोठे आव्हान बनले असल्याचे श्री नारायण डेअरीचे ऋषी जोशी यांनी सांगितले. ऐन सणासुदीच्या काळात मागणी असूनही उत्पादन करता येत नसल्याने व्यवसाय ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मोठ्या ब्रँड्सचा आधार पर्यायी इंधन
लहान व्यावसायिकांच्या तुलनेत अमूल (Amul) आणि मदर डेअरी सारख्या मोठ्या कंपन्यांची स्थिती सध्या स्थिर आहे. अमूलचे जयेन मेहता यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या एकूण गॅस गरजेपैकी 80 टक्के पुरवठा सुरळीत असून उर्वरित तूट ते डिझेलच्या साहाय्याने भरून काढत आहेत. तसेच, अमूल स्वतःच्या पिशव्या स्वतः तयार करत असल्याने त्यांना पॅकेजिंगची अडचण नाही. मदर डेअरी देखील पीएनजी (PNG) इंधनाचा वापर करत असल्याने त्यांचा पुरवठा विस्कळीत झालेला नाही. मात्र, स्थानिक डेअरी मालकांकडे केवळ 10 दिवसांचा अवधी उरला असून सरकारने तातडीने हस्तक्षेप न केल्यास दूध वितरण साखळी कोलमडू शकते.