BKTC Scam: राम मंदिरातील देणग्यांच्या कथित चोरीच्या वादानंतर आता उत्तराखंडमधील प्रसिद्ध बद्री-केदार मंदिर समिती (BKTC) भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळे अडचणीत आली आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ वकील विकेश सिंग नेगी यांनी 'माहितीचा अधिकार' (RTI) कायद्यांतर्गत मिळवलेल्या अधिकृत कागदपत्रांच्या आधारे हा खळबळजनक खुलासा केला आहे. समितीच्या काही सदस्यांनी अवघ्या एका वर्षापेक्षा कमी कालावधीत प्रवास आणि दैनंदिन भत्ता (TA/DA) या नावाखाली लाखो रुपयांची अनियमित उचल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाविकांनी देवाचरणी अर्पण केलेल्या पवित्र निधीचा हा थेट अपहार असून यावर तातडीने कडक कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी नेगी यांनी केली आहे.
नियम बाजूला सारून भत्त्यांची खिरापत
पत्रकार परिषदेत माहिती देताना वकील नेगी यांनी मंदिर कायद्याच्या कलम 26(f) चा हवाला दिला. या नियमानुसार, समितीच्या सदस्यांना केवळ अधिकृत कामकाजाच्या प्रवासासाठीच भत्ता घेता येतो. या अंतर्गत सदस्यांना आमदारांच्या (MLAs) समकक्ष म्हणजेच 6,000 रुपये दैनंदिन भत्ता आणि प्रति किलोमीटर 4 रुपये प्रवास खर्च मंजूर आहे. परंतु, गेल्या वर्षी जून महिन्यात नियुक्त झालेल्या या समितीच्या सदस्यांनी केवळ 8 महिन्यांच्या कालावधीत नियमबाह्य पद्धतीने लाखो रुपयांची बिले लाटली. धक्कादायक बाब म्हणजे, या संपूर्ण 8 महिन्यांच्या काळात मंडळाची अधिकृत अशी फक्त 1 च बैठक पार पडली होती. तरीही उप-समितीच्या बैठका आणि 'धाम' भेटींचे खोटे कारण दाखवून हा निधी वैयक्तिक फायद्यासाठी वापरण्यात आला.
हेलिकॉप्टर प्रवासाचा खर्चही मंदिराच्या तिजोरीतून
नेगी यांनी आरटीआयच्या कागदपत्रांसह आरोप केला की, या वर्षी फेब्रुवारीमध्ये बद्रीनाथ धामची कवाडे उघडण्याची तारीख ठरवण्यासाठी नरेंद्र नगर राजवाड्यात एक कार्यक्रम झाला होता. हा कार्यक्रम पारंपरिकरीत्या टिहरी राजघराण्याकडून आयोजित केला जातो आणि त्याचा मंदिर समितीच्या अधिकृत कामकाजाशी संबंध नसतो, तरीही बहुतांश सदस्यांनी तिथे हजेरी लावून भत्ते उचलले. इतकेच नव्हे तर, तीर्थक्षेत्रांची कवाडे बंद असतानाच्या काळातही काही सदस्यांनी दौरे दाखवून पैसे लाटले, तर काहींच्या केदारनाथ भेटींसाठी थेट मंदिराच्या पैशातून हेलिकॉप्टर बूक करण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने दोन सदस्यांची उदाहरणे समोर आली आहेत:
डॉ. विनीत पोस्टी: यांनी केदारनाथ, बद्रीनाथ, तुंगनाथची कवाडे बंद होण्याच्या कार्यक्रमांना आणि मदमहेश्वर जत्रेला उपस्थित राहिल्याचे दाखवून भत्ता घेतला.
प्रल्हाद पुष्पन: यांच्या मदमहेश्वर भेटीच्या बिलावर लेखा विभागाने (Audit Department) आक्षेप घेतला होता. अध्यक्षांची मंजुरी नसतानाही त्यांना हे पैसे नियमबाह्यरीत्या अदा करण्यात आले.
दरम्यान, मंदिर कायद्यानुसार समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य हे 'लोकसेवक' (public servants) या श्रेणीत येतात. त्यामुळे भाविकांच्या पैशांचा वैयक्तिक स्वार्थासाठी वापर करणाऱ्या या पदाधिकाऱ्यांवर 'भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या'न्वये थेट गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.
हेही वाचा – Ram Mandir Donation Theft: राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात मोठी अपडेट; ट्रस्टचे प्रमुख चंपत राय यांचा राजीनामा
यापूर्वीही उपाध्यक्ष विजय सिंह कपर्वाण यांनी आपल्या पत्नीला 'वर्ग-4' कर्मचारी दाखवून पैसे लाटल्याचा आणि स्वतःचे घर 'कार्यालय' घोषित करून मासिक निधी घेतल्याचा आरोप झाला होता. तसेच मंदिराच्या निधीतून 11 लाख रुपये 'तीर्थ पुरोहितांना' वाटल्याचेही उघड झाले होते. या संपूर्ण गैरव्यवहारावर बीकेटीसीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. नेगी यांनी स्पष्ट केले आहे की, समितीने आपली बाजू मांडल्यास ती देखील समोर आणली जाईल.