पंजाबमधील चंदीगडमधून मोठी बातमी समोर आली आहे. 1 एप्रिल रोजी पाच वाजण्याच्या सुमारास चंदीगडच्या सेक्टर 37 मधील भाजपच्या कार्यालयाबाहेर स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा स्फोट कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या एका होंडा एक्टिवा बाईकमध्ये झाला. स्फोटाच्या तीव्रतेने आसपास उभ्या असलेल्या वाहनांचे किरकोळ नुकसान झाले.
दरम्यान स्फोटाची माहिती समोर येताच भाजप कार्यालयाबाहेर पोलीस, अग्निशमन दल, वरिष्ठ अधिकारी आणि सीआरपीएफचे जवान तत्काळ तैनात करण्यात आले. यावेळी स्फोटानंतरचे तुकडे जप्त करण्यात आले असून पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.
यावेळी खालिस्तानी संघटनेने जबाबदारी स्वीकारली आहे. या स्फोटाच्या आवाजामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत सध्या तरी कोणत्याही जीवितहानीची माहिती समोर आलेली नसून या घटनेमुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.