Delhi Blast Update: लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या भीषण स्फोटाच्या तपासादरम्यान मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी संशयित आरोपी उमर उन नबीशी संबंधित लाल फोर्ड इकोस्पोर्ट SUV शोधून काढली आहे. ही कार हरियाणातील फरिदाबादजवळील खंडावली गावातील एका फार्महाऊसजवळ सापडली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या कारचा नोंदणी क्रमांक DL10CK0458 असून, ती राजौरी गार्डन येथील पत्त्यावरून उमर उन नबीच्या नावाने नोंदणीकृत आहे. तपास पथकाने कार जप्त करून तिची तांत्रिक तपासणी सुरू केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाच्या काही दिवस आधी आरोपींनी या लाल SUV चा वापर रेक्की आणि हालचालींसाठी केला होता, असा प्राथमिक अंदाज आहे. दिल्ली आणि हरियाणातील अनेक ठिकाणी पोलिसांनी अलर्ट जारी केल्यानंतर काही तासांतच ही कार सापडली.
सोमवारी सायंकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ पार्क केलेल्या हुंडई i20 कारमध्ये स्फोट झाला. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जखमी झाले. स्फोट इतका शक्तिशाली होता की जवळील अनेक गाड्यांना आणि इमारतींनाही नुकसान झाले. दिल्ली अग्निशमन दलाला सायंकाळी 6:55 वाजता कॉल आला आणि सात अग्निशमन गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने बचावकार्य सुरू करून जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. तपास अधिकाऱ्यांच्या मते, या घटनेचा फरीदाबादमधील अलीकडील दहशतवादी मॉड्यूलशी थेट संबंध असू शकतो. काही आरोपी आधीच अटकेत आहेत आणि त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळाल्याचे संकेत आहेत.
पंतप्रधान मोदींनी घेतली पीडितांची भेट
भूतान दौर्यावरून परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी एलएनजेपी (लोकनायक जयप्रकाश नारायण) रुग्णालयात गेले. तेथे त्यांनी स्फोटातील जखमींची भेट घेतली. त्यांनी डॉक्टर आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधून उपचार व्यवस्थेचा आढावा घेतला. पंतप्रधानांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले, “दिल्ली स्फोटातील जखमींना भेटलो. त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. या कटामागील दोषींना सोडले जाणार नाही. त्यांना कठोर शिक्षा होईल.”