SC On NEET Protest: नवी दिल्ली येथे जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात मांडण्यात आला. 'NEET' परीक्षेच्या रचनेत बदल करणे आणि 'NTA' ही संस्था बरखास्त करणे, या मुख्य मागण्यांसाठी हे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या संपूर्ण प्रकरणात न्यायालयाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी विनंती एका वकिलाने खंडपीठाकडे केली. मात्र, सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने या याचिकेत ढवळाढवळ करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला.
वेळेचा अपव्यय आणि व्हिडिओ पुराव्यांवर ताशेरे
सुनावणीच्या वेळी वकिलाने पोलिसांच्या लाठीमाराशी संबंधित काही व्हिडिओ दाखवण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली. यावर तीव्र नाराजी व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने वकिलाला फटकारले. 'तुम्ही स्वतःचा आणि न्यायालयाचा मोलाचा वेळ नाहक वाया घालवत आहात; आम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यात कोणताही रस नाही,' अशा कडक शब्दांत खंडपीठाने ही विनंती फेटाळून लावली.
मूळ प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे हस्तक्षेप नाकारला
NEET परीक्षेतील सुधारणांशी संबंधित एक मुख्य याचिका 1 आधीपासूनच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्या प्रकरणात न्यायालयाने यापूर्वीच केंद्र सरकार आणि 'NTA' कडून 2 आठवड्यांत उत्तरे मागवली आहेत. हे आधीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना, आंदोलनावरील कारवाईच्या मुद्द्यावर वेगळ्याने सुनावणी घेण्याचे न्यायालयाने टाळले आणि ही नवीन याचिका फेटाळली.