Hydrogen Train Launch: हरित आणि अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकत भारतीय रेल्वेने देशाला पहिली स्वदेशी हायड्रोजन-चलित प्रवासी ट्रेन समर्पित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकावरून या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. या अभूतपूर्व कामगिरीमुळे हायड्रोजन तंत्रज्ञानावर प्रवासी गाड्या चालवणाऱ्या जगातील निवडक देशांमध्ये भारताने आपले स्थान निश्चित केले आहे. ही ट्रेन जिंद आणि सोनीपत दरम्यानच्या सुमारे 89 किलोमीटरच्या मार्गावर धावणार आहे.
जिंद येथील जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनचे स्वप्न पूर्ण झाले असून जिंद, सोनीपत आणि हरियाणाचे नाव इतिहासात कोरले गेले आहे. त्यांनी पुढे नमूद केले की, जिंदचे प्रसिद्ध तूप आणि घेवर जरी वर्षानुवर्षे तेच राहिले असले, तरी जिंदची वृत्ती आता बदलली असून ते भाजप-एनडीएच्या सुशासनाचे नवे मॉडेल बनले आहे.
शून्य कार्बन उत्सर्जन आणि शक्तिशाली इंजिन तंत्रज्ञान
भारतीय रेल्वेचा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून ही ट्रेन संपूर्णपणे हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानावर चालते. या प्रक्रियेत डिझेलचा वापर पूर्णपणे टाळून वीज निर्मिती केली जाते, ज्यामुळे प्रदूषणाऐवजी केवळ वाफ आणि उष्णता बाहेर पडते. परिणामी कार्बन उत्सर्जन शून्य राहून पर्यावरण रक्षणाला मोठी मदत होणार आहे. ही ट्रेन 3,200 हॉर्सपॉवरच्या शक्तिशाली प्रोपल्शन सिस्टीमने सुसज्ज आहे.
गाडीचा सामान्य वेग ताशी 75 किमी असला, तरी तो ताशी 110 किमीपर्यंत वाढवता येऊ शकतो. सध्या जगभरात केवळ 2 ते 4 डब्यांच्या हायड्रोजन गाड्या धावत असताना, भारताने थेट 10 डब्यांची ट्रेन विकसित करून एक नवा जागतिक आदर्श ठेवला आहे, ज्यातून एकाच वेळी सुमारे 2,600 प्रवासी प्रवास करू शकतात.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक हायड्रोजन डिटेक्टर्स
हायड्रोजन वायूच्या वापरामुळे रेल्वेने सुरक्षेच्या निकषांवर विशेष लक्ष दिले आहे. या ट्रेनमध्ये अत्याधुनिक हायड्रोजन लीक डिटेक्टर्स, फ्लेम डिटेक्टर्स आणि ऑटोमॅटिक शट-ऑफ सिस्टीम बसवण्यात आली आहे. प्रवासादरम्यान कोणतीही तांत्रिक अडचण किंवा वायू गळती सदृश परिस्थिती निर्माण झाल्यास, ही स्वयंचलित प्रणाली हायड्रोजनचा मुख्य पुरवठा त्वरित खंडित करेल, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास पूर्णपणे सुरक्षित राहील.
केवळ 5 रुपयांपासून तिकीट दर; हेरिटेज मार्गांवरही होणार विस्तार
सामान्य नागरिकांचा प्रवास सुलभ आणि परवडणारा व्हावा यासाठी रेल्वेने तिकीट दर अत्यंत कमी ठेवले आहेत. या ट्रेनचे किमान भाडे केवळ 5 रुपये आणि कमाल भाडे 25 रुपये असणार आहे. वेळापत्रकानुसार, गाडी क्रमांक 74010 ही सकाळी 7:40 वाजता जिंद येथून सुटेल आणि सकाळी 9:40 वाजता सोनीपतला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 74009 ही सकाळी 10:40 वाजता सोनीपत येथून निघून दुपारी 1:00 वाजता जिंद स्थानकावर येईल. या यशस्वी प्रयोगानंतर भारतीय रेल्वे भविष्यात कालका-शिमला सारख्या प्रसिद्ध हेरिटेज मार्गांवरही हायड्रोजन तंत्रज्ञानाचा विस्तार करणार असून, याद्वारे 'आत्मनिर्भर भारत' आणि स्वच्छ ऊर्जेचा संकल्प अधिक दृढ केला जाईल.