TVK Govt Wins Floor Test: तामिळनाडूच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या हायव्होल्टेज ड्रामाचा आज अखेर शेवट झाला. विधानसभेत पार पडलेल्या अत्यंत महत्त्वाच्या बहुमत चाचणीत (फ्लोअर टेस्ट) मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी आपले निर्विवाद बहुमत सिद्ध केले आहे. या विजयामुळे विजय यांच्या नेतृत्वाखालील TVK सरकारवरील टांगती तलवार दूर झाली असून सत्तेवरील त्यांची पकड अधिक घट्ट झाली आहे.
बहुमताचा आकडा पार; विरोधात पडली केवळ 22 मते
विश्वासदर्शक ठरावाच्या प्रक्रियेत मुख्यमंत्री विजय यांच्या बाजूने तब्बल 144 आमदारांनी कौल दिला. विजयासाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा त्यांनी सहज पार केला. दुसरीकडे, सरकारच्या विरोधात केवळ 22 मते पडली, तर 5 आमदारांनी या मतदान प्रक्रियेत सहभागी न होता अलिप्त राहणे पसंत केले. या विजयानंतर सत्ताधारी गोटात जल्लोषाचे वातावरण असून राजकीय अस्थिरतेचं संकट आता दूर झालं आहेत.
TVK govt wins Floor Test in Tamil Nadu Assembly with majority of 144 MLAs voting in favour pic.twitter.com/bQU8aEblaa — ANI (@ANI) May 13, 2026
DMK आमदारांचा सभात्याग आणि विरोधकांचे सडेतोड प्रश्न
बहुमत चाचणीच्या प्रक्रियेदरम्यान सभागृहात प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टालिन यांनी भाषणादरम्यान मुख्यमंत्री विजय यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. “बंडखोर AIADMK सदस्यांची भेट घेणे ही केवळ सत्तेची ‘तडजोड’ आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जनतेच्या मनातील संशय बोलून दाखवताना त्यांनी याला ‘स्वच्छ प्रशासन’ म्हणता येईल का, असा खोचक प्रश्नही विचारला. भाषण संपताच निषेध म्हणून DMK च्या सर्व आमदारांनी सभागृहातून सभात्याग केला.
“आम्ही घोड्यांचा व्यापार करत नाही”; विजय यांचे प्रत्युत्तर
विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री विजय यांनी अत्यंत प्रभावीपणे आपली भूमिका मांडली. ‘घोडेबाजार’ किंवा आमदारांच्या खरेदी-विक्रीच्या आरोपांना उत्तर देताना ते म्हणाले, “हे सरकार घोड्याच्या वेगाने काम करेल, पण आम्ही घोड्यांचा व्यापार (Horse Trading) करणार नाही.” तसेच, आपले सरकार पूर्णपणे ‘धर्मनिरपेक्ष’ असेल आणि मागील सरकारने सुरू केलेल्या जनहितकारी योजना कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहतील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. या विजयामुळे तामिळनाडूच्या राजकारणात मुख्यमंत्री विजय यांचे वर्चस्व अधोरेखित झाले आहे.