Rickey Radhan Pandit: तामिळनाडूच्या राजकारणात सध्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी आपल्या मंत्रिमंडळात विशेष कार्य अधिकारी (OSD) म्हणून नियुक्त केलेले प्रसिद्ध ज्योतिषी रिकी राधन पंडित यांची अवघ्या 24 तासांच्या आत पदावरून हकालपट्टी केली आहे. युतीमधील घटक पक्षांनी दिलेल्या तीव्र इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा मोठा निर्णय घेत आपला जुना आदेश मागे घेतला आहे.
CPI(M) चा तीव्र विरोध आणि निर्णयाला कलाटणी
मुख्यमंत्री विजय यांनी मंगळवारी रिकी राधन पंडित यांची नियुक्ती केली होती. मात्र, या नियुक्तीनंतर युतीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या CPI(M) (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष) ने या निर्णयाला कडाडून विरोध केला. एका ज्योतिष्याला सरकारी पदावर नियुक्त करणे लोकशाही आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला धरून नसल्याची भूमिका डाव्या पक्षांनी मांडली. युतीमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने मुख्यमंत्री विजय यांनी तातडीने पावले उचलत पंडित यांची नियुक्ती रद्द करण्याचा अधिकृत आदेश जारी केला.
TVK spokesperson Rickey Radhan Pandit Vettrivel's appointment as Officer on Special Duty (OSD) to Tamil Nadu Chief Minister revoked. pic.twitter.com/4j2tAohBUa — ANI (@ANI) May 13, 2026
शपथविधीचा मुहूर्त ठरवणारे राधन पंडित चर्चेत
रिकी राधन पंडित हे तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात मोठे नाव आहे. त्यांनीच विधानसभा निवडणुकीपूर्वी विजय यांच्या विजयाचे भाकीत केले होते. एवढेच नव्हे तर, राज्यपालांनी सरकार स्थापनेची परवानगी दिल्यावर शपथविधीची वेळही त्यांनीच निश्चित केली होती. सुरुवातीला 10 मे रोजी दुपारी 3:45 चा मुहूर्त दिल्यानंतर त्यांनी तो बदलून सकाळी 10:00 वाजताचा केला होता. त्यांच्या सल्ल्यानुसारच विजय यांनी अनेक महत्त्वाचे पाऊल उचलले होते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
दिग्गज नेत्यांशी असलेले संबंध
राधन पंडित यांची ओळख केवळ विजय यांचे मार्गदर्शक इतकीच मर्यादित नाही. तामिळनाडूतील अनेक वरिष्ठ नेते त्यांचा सल्ला घेत असतात. असे म्हटले जाते की, माजी मुख्यमंत्री जयललिता यादेखील महत्त्वाच्या निर्णयांसाठी त्यांच्याशी चर्चा करत असतं. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ते सक्रिय असून लोकांच्या ज्योतिषविषयक शंकांचे निरसन करत असतात. मात्र, आता थेट सरकारी प्रशासकीय पदावर त्यांची झालेली नियुक्ती आणि त्यानंतरची हकालपट्टी तामिळनाडूच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे.