KLM Airlines Controversy: पेरूला निघालेल्या एका भारतीय कुटुंबाची स्वप्नवत सहल अचानक वादाच्या भोवऱ्यात सापडली आणि सहलीला जाण्याऐवजी कोर्टात जावे लागले. तब्बल 49 लाख रुपयांची बिझनेस क्लास तिकीटे जवळ असतानाही या सर्वांना विमानात चढू दिले गेले नाही. या प्रकरणानंतर पिडीत कुटुंबाने थेट न्यायालयात धाव घेतली. विमान कंपनीने दिलेली वागणूक आणि मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे त्यांनी न्यायाच्या मागणीसाठी कायदेशीर लढा देण्याचा पर्याय त्यांनी नाईलाजाने स्वीकारला आहे. या कुटुंबाला वैध व्हिसा नसल्याचे कारण देण्यात आले होते. मात्र, हे कारण योग्य नसल्याचे या सर्वांचे म्हणणे आहे. हे प्रकरण नेमके आहे तरी काय? लाखो रुपयांची तिकिटे काढूनही भारतीय कुटुंबाला विमानात प्रवास का नाकारण्यात आला, जाणून घेऊ सविस्तर…
नेमके प्रकरण काय आहे?
तामिळनाडूतील सेलम येथील एका वैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष जे.एस. सतीशकुमार यांनी जून 2024 मध्ये आपल्या कुटुंबातील 8 सदस्यांसह पेरू (Peru) येथे जाण्याचा बेत आखला. या सहलीसाठी त्यांनी सुमारे 49 लाख रुपये खर्च करून बिझनेस क्लासची 8 नॉन-रिफंडेबल तिकिटे बुक केली. 19 जून रोजी जेव्हा हे कुटुंब बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले, तेव्हा चेक-इन काउंटरवर तासनतास वाट पाहायला लावल्यानंतर एअरलाईन कर्मचाऱ्यांनी अखेर त्यांना विमानात चढण्यापासून रोखले. व्हिसाचे कारण पुढे करत या सर्वांना विमानात प्रवेश देण्यास नकार देण्यात आला. तुमच्याकडे पेरू देशाचा व्हिसा नसल्याने तुम्ही प्रवास करू शकत नाही, असे त्यांना ‘केएलएम’ रॉयल डच एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
व्हिसा नियमांच्या चुकीच्या अर्थाचा फटका?
सतीशकुमार यांनी विमान कंपनीचा दावा खोडून काढला आहे. त्यांच्या मते, विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्हिसा नियमांचा चुकीचा अर्थ लावला. त्यांनी अधिकृत मार्गदर्शक तत्त्वांचा दाखला देत म्हटले की, भारतीय पारपत्रधारकांनी काही अटी पूर्ण केल्यास त्यांना पेरू देशात व्हिसाशिवाय प्रवेश दिला जातो. ज्या भारतीयांकडे आधीच अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया यांसह युरोपमधील कोणत्याही देशाचा वैध व्हिसा आहे, त्यांना पेरूचा स्वतंत्र व्हिसा काढावा लागत नाही. आवश्यक ती पात्रता असतानाही विमान कंपनीने आम्हाला प्रवास करण्यापासून रोखले, असा आरोपही सतीशकुमार यांनी केला. त्याबाबत त्यांनी एअरलाइन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य परिचालन अधिकारी यांच्याविरोधात पोलिसांत एफआयआरही दाखल केला. इतका संघर्ष करूनही आपल्याला तिकिटांचा परतावा मिळाला नसल्याचे सतीश कुमार सांगितले.
रेड-फ्लॅग आणि आंतरराष्ट्रीय त्रास
49 लाख खर्च करूनही सहलीला जाऊ न शकलेल्या या कुटुंबाचा आरोप आहे की, जेव्हा त्यांनी याला विरोध केला आणि कायदेशीर कारवाईची भाषा केली, तेव्हा एअरलाईनने त्यांना 'रेड-फ्लॅग' म्हणजेच अंतर्गत ब्लॅकलिस्ट केले. याचा परिणाम असा झाला की, नंतर जेव्हा सतीशकुमार यांचा मुलगा सिंगापूरला गेला, तेव्हा त्याला तिथे थांबवून पेरू येथून 'डिपोर्ट' (हद्दपार) झाल्याबद्दल विचारपूस करण्यात आली, जरी तो कधी पेरूमध्ये पोहोचलाच नव्हता. खुद्द सतीशकुमार यांनाही ऑस्ट्रेलिया प्रवासादरम्यान अशाच प्रकारच्या चौकशीला आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.
न्यायालयाची कडक भूमिका; डच एअरलाईन्स अडचणीत
पेरू सहलीसाठी निघालेल्या सतीश कुमार आणि त्यांच्या कुटुंबीयांना विमानात प्रवास नाकारणे ‘केएलएम’ रॉयल डच एअरलाइन्सला महागात पडण्याची शक्यता आहे. सतीशकुमार यांच्या तक्रारीची दखल घेत देवनहल्लीच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना KLM च्या बड्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. बोर्डिंग नाकारल्याच्या आरोपावरून विमान कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य परिचालन अधिकारी यांच्यावर अशा प्रकारची कारवाई होण्याची ही दुर्मीळ घटना आहे. सतीशकुमार यांच्या मते, हा केवळ परताव्याचा (Refund) विषय नसून उत्तरदायित्वाचा आहे. जर आज कारवाई झाली नाही, तर उद्या इतर कोणत्याही प्रवाशासोबत असेच घडू शकते. दरम्यान, KLM एअरलाईन्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ते नियमांचे पालन करण्यास बांधील आहेत आणि योग्य कागदपत्रे सोबत ठेवणे ही प्रवाशांची जबाबदारी आहे.