7 Year old Girl dies in Classroom DJ noise: उत्सव काळात वाजवल्या जाणाऱ्या अनियंत्रित डीजे आणि त्याच्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका खासगी शाळेत इयत्ता 2 री मध्ये शिकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थिनीचा वर्गातच अचानक मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शाळेच्या आवाराजवळून जाणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीतील डीजेच्या प्रचंड दणदणाटामुळेच आपल्या मुलीचा जीव गेल्याचा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.
सीसीटीव्हीमध्ये कैद झाला अस्वस्थतेचा प्रसंग
वैष्णवी तिवारी असे या दुर्दैवी बालिकेचे नाव असून ती नेहमीप्रमाणे बलरामपूर नगर येथील शाळेत हजर होती. वर्ग सुरू असतानाच बाहेरून मोठ्या आवाजात डीजे लावून गणेश विसर्जनाची मिरवणूक जात होती. डीजेचा दणदणाट सुरु असतानाच वैष्णवी अचानक अस्वस्थ झाली आणि काही क्षणांतच वर्गात जमिनीवर कोसळली; हा संपूर्ण प्रकार शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून शिक्षकांनी तिला तात्काळ जिल्हा मेमोरियल रुग्णालयात उपचारासाठी नेले, परंतु डॉक्टरांनी तपासण्यापूर्वीच तिला मृत घोषित केले.
वैद्यकीय तपासणी आणि अंत्यसंस्काराची माहिती
ही घटना उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथे घडली आहे, येथील जिल्हा मेमोरियल रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरधर चौहान यांच्या माहितीनुसार, बालिकेला रुग्णालयात आणले तेव्हा तिचा आधीच मृत्यू झाला होता. शवविच्छेदन (Post-Mortem) करण्यात न आल्यामुळे मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मुलीचा मृतदेह घेऊन कुटुंबीय थेट सिद्धार्थनगर जिल्ह्यातील गुलहरिया गंगापूर या आपल्या मूळ गावी गेले आणि तेथेच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेप्रकरणी पालकांनी अद्याप पोलिसांत कोणतीही अधिकृत तक्रार नोंदवलेली नाही.
शिक्षणासाठी शहरात आलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
आपल्या मुलीला उत्तम शिक्षण मिळावे या उद्देशाने तिचे वडील सोनू तिवारी हे बलरामपूर शहरात भाड्याच्या खोलीत राहत होते. मात्र, या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण तिवारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महाराष्ट्रात विद्यानंद बापट यांनी अशा कर्णकर्कश ध्वनिक्षेपकांविरोधात सुरू केलेल्या चळवळीची आठवण या घटनेमुळे ताजी झाली असून ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न किती भयंकर असू शकतो हे पुन्हा सिद्ध झाले आहे.
कठोर नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमधून प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. शाळा, रुग्णालये, आणि वर्दळीच्या निवासी क्षेत्रांजवळ डीजे आणि लाउडस्पीकरच्या आवाजावर तीव्र मर्यादा घालण्याची मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने अशा ठिकाणी ध्वनीप्रदूषणाशी संबंधित नियमांची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी आता सर्व स्तरातून केली जात आहे.
थाना को0 नगर क्षेत्रांतर्गत छोटी बच्ची की मृत्यु की घटना के संबंध में पुलिस द्वारा की गई कार्यवाही के संबंध में क्षेत्राधिकारी नगर की बाइट https://t.co/HSeuaVN8oq — BALRAMPUR POLICE (@balrampurpolice) September 22, 2026