Crime News : मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात एका महिला प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) निरीक्षकाला अत्यंत निर्घृणपणे संपवण्यात आलं. भोपाळमधील खजुरी भागातील लेक पर्ल कॉलनीत सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. दातिया येथे कार्यरत असलेल्या 36 वर्षीय मीनाक्षी गोखले या महिला अधिकाऱ्याला डोक्यात हातोड्याने वार करून संपवण्यात आलं. या घटनेनंतर काही अंतरावरच संशयित आरोपी पवन कुमार द्विवेदी याने गळफास घेऊन टोकाचं पाऊल उचललं. या घटनेमुळे मध्य प्रदेशचे RTO प्रशासन आणि पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मैत्रिणीने आरडाओरड केल्यानंतर घटना उघडकीस
मिळालेल्या माहितीनुसार, मूळच्या इंदूर येथील रहिवासी असलेल्या मीनाक्षी गोखले रविवारी संध्याकाळी आपल्या 3 वर्षांच्या लहान मुलीसह आणि एका मैत्रिणीसोबत पवनच्या घरी गेल्या होत्या. रात्रीचे जेवण झाल्यानंतर मैत्रीण आणि मुलगी आतील खोलीत झोपण्यासाठी गेल्या. सोमवारी सकाळी मैत्रिणीला मीनाक्षी या रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घराच्या पोर्चमध्येच मीनाक्षी यांच्यावर रक्ताळलेल्या हातोड्याने हल्ला करण्यात आला आणि नंतर त्यांचा मृतदेह ओढून आत नेण्यात आला. घटनेनंतर पवन गायब होता, परंतु स्थानिक रहिवाशांनी शोध घेतला असता घरापासून 20 ते 50 मीटर अंतरावर असलेल्या एका झाडाला त्याने गळफास लावून घेतल्याचे दिसून आले.
पोलीस तपासातून कारण स्पष्ट होणार
इंदूरमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना मीनाक्षी यांची ओळख पवनसोबत झाली होती, जो तेथे कोचिंग क्लास चालवत होता. सुमारे 2 वर्षांपूर्वी पतीपासून घटस्फोट घेतलेल्या मीनाक्षी RTO विभागात अधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या. प्राथमिक तपासात पवनला मीनाक्षी यांच्याशी विवाह करायचा होता, परंतु त्यांच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. रविवारी आपले काही सामान आणण्यासाठी त्या पवनच्या घरी गेल्या असता दोघांमध्ये वाद झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांनी गुन्ह्यासाठी वापरलेला हातोडा जप्त केला असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास खजुरी पोलीस करत आहेत.