Diesel Isobutanol Blending: इंधन क्षेत्रात भारताचे नवे पाऊल; पेट्रोलनंतर आता डिझेलमध्ये ‘या’ घटकाचे मिश्रण करणार; नितीन गडकरींची मोठी घोषणा

पेट्रोलमध्ये E20 लागू करण्याच्या दिशेने महत्त्वाची प्रगती झाल्यानंतर केंद्र सरकारने आता डिझेलसाठीही जैवइंधनाचा वापर वाढवण्याची तयारी सुरू केली आहे.

Diesel Isobutanol Blending: इंधन क्षेत्रात भारताचे नवे पाऊल; पेट्रोलनंतर आता डिझेलमध्ये ‘या’ घटकाचे मिश्रण करणार; नितीन गडकरींची मोठी घोषणा

Diesel Isobutanol Blending: पेट्रोलमध्ये E20 लागू करण्याच्या दिशेने महत्त्वाची प्रगती झाल्यानंतर केंद्र सरकारने आता डिझेलसाठीही जैवइंधनाचा वापर वाढवण्याची तयारी सुरू केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत मोठी घोषणा करत, डिझेलमध्ये 15 टक्क्यांपर्यंत आयसोब्युटेनॉल (Isobutanol) मिसळण्याची योजना तयार करण्यात येत असल्याची माहिती दिली. या उपक्रमामुळे कच्च्या तेलावरील आयातीवरील अवलंबित्व कमी होण्याबरोबरच परकीय चलनाची बचत आणि स्वदेशी इंधनाला चालना मिळेल, असा सरकारचा विश्वास आहे.

डिझेलमध्ये इथेनॉलऐवजी आयसोब्युटेनॉलचाच पर्याय का?

गडकरी यांनी स्पष्ट केले की, पेट्रोलप्रमाणे डिझेलमध्ये थेट इथेनॉल मिसळणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. इथेनॉल आणि डिझेलच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये फरक असल्याने दोन्ही सहजपणे एकत्र मिसळत नाहीत. त्यामुळे संशोधकांनी इथेनॉलवर प्रक्रिया करून आयसोब्युटेनॉल तयार करण्याचे तंत्र विकसित केले आहे. हे इंधन डिझेलमध्ये सहज मिसळते आणि डिझेल इंजिनमध्ये प्रभावीपणे वापरता येते.

इंजिनची कार्यक्षमता कायम, प्रदूषणातही घट

सरकारच्या माहितीनुसार, आयसोब्युटेनॉल हे पारंपरिक जैवइंधनांच्या तुलनेत अधिक ऊर्जा निर्माण करणारे इंधन मानले जाते. याचा वापर केल्याने इंजिनच्या कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम होत नाही. उलट, डिझेलच्या तुलनेत कार्बन उत्सर्जन कमी करण्यासही याची मदत होते. या तंत्रज्ञानाची चाचणी म्हणून 100 टक्के इथेनॉल आणि आयसोब्युटेनॉलच्या साहाय्याने दोन जनरेटर यशस्वीपणे चालवण्यात आल्याचा दावाही गडकरी यांनी केला. त्यामुळे भविष्यात या इंधनाचा वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इंजिन खराब होण्याच्या चर्चांवर सरकारचे स्पष्टीकरण

जैवइंधनामुळे वाहनांच्या इंजिनवर विपरीत परिणाम होतो किंवा वाहनाची वॉरंटी आणि विमा रद्द होतो, अशा चर्चांना पेट्रोलियम मंत्रालयाने फेटाळून लावले आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जैवइंधनाचा वापर हा वैज्ञानिक चाचण्या आणि तांत्रिक निकषांच्या आधारेच मंजूर करण्यात आला असून, वाहनधारकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.

हेही वाचा – Telegram केंद्र सरकारच्या रडारवर! चित्रपट, OTT कंटेंट पायरसी आणि बनावट अकाऊंट्स प्रकरणी 15 दिवसांचा अल्टिमेटम

परकीय चलन बचतीलाही मोठा हातभार

केंद्र सरकारच्या मते, देशात जैवइंधनाचा वापर वाढवल्यामुळे इंधन आयातीवरील खर्चात लक्षणीय बचत झाली आहे. आतापर्यंत या धोरणामुळे 1.9 लाख कोटी पेक्षा अधिक परकीय चलनाची बचत झाल्याचा दावा सरकारने केला असून, पुढील काळात डिझेलमध्ये आयसोब्युटेनॉलचा वापर वाढल्यास ही बचत आणखी वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number