गोव्याच्या लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, 7 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी

लईराई देवीच्या वार्षिक जत्रेला हजारो भाविकांची उपस्थिती होती. भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याने परिस्थिती बिघडली आणि चेंगराचेंगरी झाली

गोव्याच्या लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, 7 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी

गोवा: गोव्यातील प्रसिद्ध शिरगाव जत्रोत्सवात घडलेल्या दुर्घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. लईराई देवीच्या वार्षिक जत्रेला हजारो भाविकांची उपस्थिती होती (Lairai Devi temple). गोव्याच्या विविध भागांसह सिंधुदुर्ग आणि कर्नाटकातूनही भक्त मोठ्या संख्येने दाखल झाले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही ही यात्रा उत्साहात सुरू झाली होती, परंतु शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याने परिस्थिती बिघडली आणि चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला असून 30 पेक्षा अधिक भाविक जखमी झाले आहेत. 

अपघात घडताच घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. गंभीर जखमींना तातडीने डिचोली आरोग्य केंद्र, म्हापसा जिल्हा रुग्णालय आणि गोमेकॉ येथे दाखल करण्यात आले. मृतांमध्ये दोन महिला, दोन पुरुष आणि एका 17 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. सुमारे 20 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिस प्रशासनाने तत्काळ बचाव कार्य सुरू केले असून गर्दी नियंत्रणासाठी ड्रोनच्या सहाय्याने परिसराची तपासणी केली जात आहे. तसेच, मंदिर परिसरात संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी 23 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या अपघातानंतर प्रशासन आणि राजकीय नेतृत्वाने तातडीने पुढाकार घेतला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि जखमींना भेटून त्यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. आमदार चंद्रकांत शेट्ये, जिल्हाधिकारी स्नेहा गीते आणि इतर अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन व्यवस्थेची पाहणी केली. मुख्यमंत्री सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही चर्चा करून घटनेबाबत माहिती दिली. पंतप्रधानांनीही या कठीण प्रसंगी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले आहे.

दुर्घटनेनंतर आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी तात्काळ अतिरिक्त डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफची नियुक्ती करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले की, गोवा वैद्यकीय महाविद्यालय (GMC) आणि इतर रुग्णालयांत विशेष नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक रुग्णाच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. लईराई देवीची जत्रा हा गोमंतकीय जनतेसाठी श्रद्धेचा विषय असून, ही दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.      

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number