Youth Killed over Assault Allegations: एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला डांबून ठेवल्याच्या व अत्याचार केल्याच्या संशयावरून सुमारे 100 ते 150 लोकांच्या जमावाने एका तरुणाला क्रूरपणे मारहाण करत ठार केले. सोमवारी रात्री ही मुलगी बेपत्ता झाली होती आणि मंगळवारी सकाळी सापडल्यानंतर तिने संबंधित तरुणावर घरात डांबून ठेवल्याचा आरोप केला. या आरोपांची बातमी पसरताच गावात तीव्र संतापाची लाट पसरली आणि संतप्त गावकऱ्यांनी कायदा हातात घेत हिंसक कृत्य केले.
आई-वडिलांना वाचवण्यासाठी आलेल्या तरुणावर लाठ्या-काठ्या अन् दगडांनी हल्ला
अफवा पसरताच आक्रमक झालेल्या जमावाने सुरुवातीला त्या तरुणाच्या घरात घुसून त्याच्या आई-वडिलांना बांधून ठेवले आणि त्यांना अमानुष मारहाण करण्यास सुरुवात केली. आपल्या वृद्ध आई-वडिलांचा जीव वाचवण्यासाठी तरुण जेव्हा मध्यस्थी करायला आला, तेव्हा जमावाने आपला मोर्चा त्याच्याकडे वळवला. जमावाने त्याला लाठ्या-काठ्यांनी आणि दगडांनी रक्तबंबाळ होईपर्यंत अमानुषपणे मारहाण केली. या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. झारखंडमधील चतरा जिल्ह्यात ही कायदा अन् सुव्यवस्थेला काळिमा फासणारी अत्यंत भयानक घटना घडली आहे.
56 जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल; पोलिसांसमोरच हल्ला झाल्याचा वडिलांचा आरोप
याप्रकरणी मृत तरुणाच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी 56 जणांची नावे नमूद करत जमावाविरुद्ध हत्येचा एफआयआर (FIR) नोंदवला आहे. घरावर हल्ला झाला तेव्हा घटनास्थळी काही पोलीस कर्मचारी उपस्थित होते, मात्र त्यांच्यासमोरच जमावाने मुलाची हत्या केल्याचा गंभीर आरोप मृत मुलाच्या वडिलांनी केला आहे. मुलगी आपल्या घरात नसल्याचे सांगूनही कोणीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
10 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; गावात कडक बंदोबस्त
या लिंचिंग प्रकरणी ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर (BDO) देवलाल उरांव यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 10 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलीच्या आरोपांची सत्यता पडताळण्यासाठी तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवालानंतरच पुढील माहिती स्पष्ट होईल. दरम्यान, मृत तरुणावर 2023 मध्येही एका बलात्कार प्रकरणात गुन्हा दाखल होऊन तो तुरुंगात गेला होता. सध्या गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.