World Para Athletics Championship 2025: जागतिक पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या पहिल्या दिवशी भारताने शानदार सुरुवात केली. शनिवारी पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत शैलेश कुमारने सुवर्णपदक जिंकले तर वरुण भाटीने कांस्यपदक मिळवले. शैलेश कुमारने T42 प्रकारात 1.91 मीटर उंची गाठून नवीन चॅम्पियनशिप विक्रम प्रस्थापित केला. तसेच शैलेशने मागील विक्रम मोडला आणि अमेरिकेचा ऑलिंपिक चॅम्पियन एज्रा फ्रेचला मागे टाकत सुवर्णपदक मिळवले. तथापी, वरुण भाटीने 1.85 मीटर उंची गाठून कांस्यपदक जिंकले. त्याच स्पर्धेत राहुल 1.78 मीटरपेक्षा जास्त उंच उडी मारू शकला नाही. त्यामुळे त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
हेही वाचा – Asia Cup Final 2025: भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला तर कोण ठरेल विजेता? सर्व नियम जाणून घ्या
महिला स्पर्धांमध्ये भारताच्या दीप्ती जीवनजीने 400 मीटर T20 फायनलमध्ये रौप्य पदक जिंकलं. त्यामुळे भारताची एकूण पदक संख्या 3 वर गेली. ही 12वी जागतिक पॅरा अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा 27 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आली आहे. 100 हून अधिक देशांतील 1,000 हून अधिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी आहेत, ज्यामुळे ही भारतातील सर्वात मोठी पॅरा-अॅथलेटिक्स स्पर्धा ठरली आहे.
हेही वाचा – IND vs PAK Live Streaming: भारत-पाकिस्तान आशिया कप 2025 सामना किती वाजता, कुठे आणि कसा पाहू शकता?
स्पर्धेत स्प्रिंट, रिले, लांब पल्ल्याच्या शर्यती, उडी आणि थ्रो यांसारख्या 186 पदक स्पर्धा आहेत. जेएलएन स्टेडियममध्ये जागतिक मानकांची मोंडो ट्रॅक सुविधा आणि खेळाडूंसाठी उत्कृष्ट सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धेचे उद्घाटन करताना खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आणि स्पर्धेला 'मानवी दृढनिश्चय आणि आत्म्याचा उत्सव' म्हणून गौरविले. त्यांनी नमूद केले की ही स्पर्धा जागतिक पातळीवर समावेशक आणि चैतन्यशील क्रीडा संस्कृतीला प्रेरणा देईल.