Workplace Harassment Victim Woman Ends Her Life: कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळाबाबत एक अत्यंत वेदनादायी घटना समोर आली आहे. 45 वर्षीय नागेश्वरी यांनी ऑफिसमधील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरातच टोकाचे पाऊल उचलले. शुक्रवारी त्यांचे पती अशोक यांनी त्यांना वारंवार फोन केले, मात्र फोनला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने ते तातडीने घरी पोहोचले. त्यावेळी नागेश्वरी या निपचित पडलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यांनी तात्काळ नागेश्वरी यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
चिठ्ठीत उघड झाला छळ; 'डॉली' नावाच्या सुपरवायझरवर गंभीर आरोप
घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तपासादरम्यान नागेश्वरी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली सुसाईड नोट जप्त केली आहे. कर्नाटकातील म्हैसूर शहरात ही घटना घडली आहे. हिंकल परिसरातील रहिवासी असलेल्या नागेश्वरी या गेल्या अनेक वर्षांपासून एका स्थानिक सुपरमार्केटमध्ये कार्यरत होत्या. सुसाईड नोटनुसार, काही महिन्यांपूर्वी त्या सुपरमार्केटमध्ये 'डॉली' नावाची नवी सुपरवायझर रुजू झाली आणि तेथूनच नागेश्वरी यांच्या मानसिक छळाची मालिका सुरू झाली. डॉली त्यांना कोणतीही चूक नसताना टोमणे मारणे, अतिरिक्त कामाचा ताण देणे, कामावरून अपमानित करणे आणि त्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या (Week Off) वारंवार रद्द करणे अशा विविध मार्गांनी सतत छळत होती.
आजारपणात 3 दिवस सुट्टी घेतली अन् कामावरून काढण्याची धमकी दिली
सुसाईड नोटमध्ये नागेश्वरी यांनी आपल्यावरील बेकायदेशीर कारवाईचा आणि अन्यायाचा पाढाच वाचला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी नुकतीच 3 दिवसांची रजा घेतली होती. या कारणावरून सुपरवायझर डॉलीने त्यांना पुन्हा असा प्रकार केल्यास थेट नोकरीवरून काढून टाकण्याची थेट धमकी दिली होती. कोणतीही चूक नसताना मिळणारी ही वागणूक, आजारपणातील तणाव आणि रोजचा मानसिक त्रास सहन न झाल्यानेच नागेश्वरी यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सुसाईड नोटमध्ये स्पष्ट लिहिले आहे.
पती अशोक यांची कडक कारवाईची मागणी; पोलिसांकडून गुन्हा दाखल
या घटनेनंतर धक्का बसलेल्या पती अशोक यांनी संबंधित सुपरमार्केट प्रशासन आणि कारणीभूत ठरलेल्या आरोपी सुपरवायझरवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नागेश्वरी यांनी विषारी पदार्थाचे सेवन करून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या सुसाईड नोटच्या आधारे संबंधित आरोपींवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास वेगाने सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.